भाईंदर : मनोरंजनातून आधुनिक विज्ञानाची ओळख मुलांना व्हावी,त्यांच्या जिज्ञासेला चालना मिळावी या उद्देशाने भाईंदर येथील बाळासाहेब ठाकरे कला दालनात महापालिकेकडून विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. नुकतेच याचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.भाईंदर पूर्वे येथील गोल्डन नेस्ट परिसरात बाळासाहेब ठाकरे कला दालन उभारण्यात आले आहे.यासाठी लागणारा निधी राज्य शासनाकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपलब्ध करून दिला आहे. या अंतर्गत आर्ट गॅलरी, गेम झोन, अभ्यासिका आदींची सुविधा तयार करण्यात आली असून, त्यात आता आणखी भर म्हणून एका खोलीत नव्याने विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे.

या केंद्रात लहान मुलांना एआय प्रणालीद्वारे अंतराळातील घडामोडी, ग्रहांचे गुरुत्वाकर्षण, तसेच विविध वैज्ञानिक प्रयोग प्रत्यक्ष करून अनुभवता येणार आहेत. प्रामुख्याने हे केंद्र मुलांच्या मनोरंजनासोबत ज्ञानवर्धनाच्या दृष्टीने तयार करण्यात आले असून गुरुवारी त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.यावेळी दिग्दर्शक मंगेश देसाई आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

इस्रोबाबत अधिक माहिती :

विज्ञान केंद्रामध्ये इस्रो टाइमलाईन झोन तयार करण्यात आला आहे. येथे भारताच्या अंतराळ प्रवासाचा तेजस्वी इतिहास नमूद करण्यासाठी इस्रोच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या यशोगाथांचा डिजिटल अनुभव मुलांना घेता येणार आहे. तर यामुळे लहान मुलांमध्ये वैज्ञानिक होण्याची प्रेरणा निर्माण होण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

महापालिकेवर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी

मिरा भाईंदर महापालिकेने बाळासाहेब ठाकरे कलादालात अभ्यासिका, गेम झोन, विज्ञान केंद्र आणि इतर गोष्टीची उभारणी केली आहे.मात्र वास्तूच्या उदघाटनानंतर त्याची तोडफोड होण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे या वास्तुच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून धोरण निश्चित केले जात असून याबाबतची जबाबदारी महापालिका स्वतःकडे राखून ठेवणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.