भाईंदर:-पाळीव प्राण्यांवर अंत्य विधीची प्रक्रिया करता यावी म्हणून भाईंदरच्या नवघर गावात स्वतंत्र विद्युत दाहिनीची उभारणी करण्यात आली आहे.प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सोय करून देणारी ही राज्यातील पहिली महापालिका असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
मिरा भाईंदर शहरात मोकाट फिरत असलेल्या श्वान, मांजर आणि जनावरांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता पालिकेकडून उत्तन येथे निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.शिवाय उपचारसाठी दवाखाना देखील उभारला आहे.मात्र प्राण्याचा मृत्यू झाल्यास त्यांची विल्हेवाट लावण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे मृत प्राण्यांच्या अंत्यविधी करण्यासाठी अडचणी निरनिर्माण होत होत्या.
यासाठी पाळीव प्राण्यांवर अंत्यविधी साठी स्वतंत्र सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे पाठपुरावा करून महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार मुर्धा गावात आणि भाईंदर च्या नवघर गावात विद्युत दाहिनी उभारण्याचे काम करण्यात आले आहे. यात नवघर स्मशान दाहीनी चे सोमवारी सरनाईक यांनी लोकार्पण करून वापरासाठी खुली केली आहे.
राज्यभरात उपक्रम राबवणार:-
राज्यभरातील पाळीव प्राण्यांवर अंत्यविधी करता यावा म्हणून विविध शहरातील घनकचरा प्रकल्प स्थळी सशुल्क स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या संदर्भात महापालिकांना सूचित करण्यात आले असून याबाबत चे शासन आदेश देखील प्रसिद्ध करण्यात आले असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे.