घरोघरी पाणी योजनेचा प्रारंभ; पहिल्या टप्प्यात १ हजार नळजोडण्या

वसई : गेल्या अनेक वर्षांपासून नायगाव पूर्वेतील चंद्रपाडा ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ घरोघरी नळाच्या प्रतीक्षेत होते. अखेर घरोघरी नळ योजनेचा प्रारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात १ हजार कुटुंबांना नळजोडण्या देण्यात येणार आहेत. यामुळे येथील नागरिकांची पाण्याची चिंता मिटणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून चंद्रपाडा- वाकीपाडा येथील नागरिक घरोघरी नळ योजनेपासून वंचित होते. या नागरिकांना ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक नळजोडणी द्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र यामुळे काहींना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नव्हते. तर काही वेळा स्टॅण्डपोस्टवर पाणी भरण्यासही नागरिकांना अडचणी निर्माण होत होत्या. यामुळे घरोघरी नळजोडणी देऊन पाणी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांकडून करण्यात येत होती.

या नुसार ग्रामपंचायतीने घरोघरी नळजोडणी योजनेचा आराखडा तयार करून नागरिकांच्या घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ही योजना सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडून ८१ लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. तर ग्रामविकास निधी व १५ व्या वित्त आयोग यातून येणारा निधी असे एकूण १ कोटी ३५ लाख रुपये इतका निधी खर्च केला जाणार असल्याची ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात १ हजार नळजोडण्या देण्यात येणार आहेत. यासाठी ४ हजार रुपये अनामत रक्कम व ३ हजार रुपये  नळजोडणी असे एकूण सात हजार रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे. तसेच चंद्रपाडा- वाकीपाडा हा भाग उंच-सखल असा असल्याने सर्व नागरिकांना समदाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी शाफ्ट ही यंत्रणा सुद्धा बसविली जाईल जेणेकरून सर्व नागरिकांना पाणी मिळू शकेल.

मंगळवारी या योजनेचा प्रारंभ पाणीपुरवठा कर्मचारी रमाकांत डोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला असून नळजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी, पंचायत समिती सदस्य शुभांगी बेंद्रे, सरपंच विनया पडवले, उपसरपंच वंदना म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

पाझर तलावात मुबलक पाणीसाठा

मागील वर्षी मे महिन्याच्या अखेरीस नायगाव पूर्वेतील जूचंद्र, चंद्रपाडा, वाकीपाडा या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाझर तलावाची पातळी खालावली होती. यामुळे या भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. परंतु यंदाच्या वर्षी पाझर तलवात पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसानेसुद्धा यात पाण्याची भर घातली आहे.

ग्रामपंचायत चंद्रपाडा हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी जिल्हा परिषदेकडून कर्जही घेतले आहे. लवकरच या योजनेचे काम पूर्ण केले जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एम. एस. जाधव, ग्रामसेवक ग्रामपंचायत चंद्रपाडा