वसई:– मध्यप्रदेशात घडलेल्या बालमृत्यू प्रकरणानंतर राज्यभरात औषधांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने वसई विरार भागात औषध तपासणी मोहीम सुरू केली आहे.वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी रुग्णालयांमधील औषधसाठ्याची सखोल तपासणी सुरू आहे. विशेषतः लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या सिरप स्वरूपातील औषधांवर या तपासणीचा अधिक भर आहे. अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या रुग्णालयांसह विविध खासगी रुग्णालयांमधील औषध साठा तपासला जात आहे.
काही औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. यासोबतच परिसरातील मेडिकल स्टोअरमध्ये फार्मासिस्ट नसताना औषधांची विक्री केली जात आहे का, याचीही पडताळणी केली जात आहे.तपासणीदरम्यान सिरप उत्पादन करणाऱ्या औषध उत्पादक कंपन्यांची कागदपत्रे, औषधांच्या आवक-जावक नोंद वही तपासणी, तसेच विक्री परवान्यांची वैधता याबाबत सुद्धा सखोल चौकशी केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ही मोहीम नियमितपणे सुरू ठेवण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
वसई विरार भागात औषध उत्पादक व विक्रेते यांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. असे औषध निरीक्षक सतीश चव्हाण यांनी सांगितले आहे.औषध खरेदीकरताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे असे आवाहन ही त्यांनी नागरिकांना केले आहे.