वसई: दिवाळीच्या उत्साहाला कलात्मकतेची जोड देण्यासाठी नालासोपाऱ्यात एक दिवसीय आकाशकंदील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत शहरातील विविध भागातील चिमुकल्यांनी सहभाग घेत रंगीबेरंगी आणि पर्यावरणस्नेही आकाशकंदील साकारले आहेत.
वसई विरार शहरात दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम तसेच कार्यशाळांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमातून तसेच कार्यशाळांमधून लहान मुलांना नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळते. तर त्यांच्या कलागुणांना देखील वाव मिळतो. याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही नालासोपाराच्या वाघोली मंदिरात संजीवनी परिवार या संस्थेतर्फे एक दिवसीय आकाशकंदील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
नुकताच ही कार्यशाळा पार पडली. शहरातील विविध भागातील ८५ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला होता. तर प्रसिद्ध शिल्पकार सचिन चौधरी यांनी आकाशकंदील बनवणाऱ्या मुलांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने रंगीबेरंगी कागद व पर्यावरण पूरक अशा विविध साहित्याचा वापर करून वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकारचे आकर्षक आकाशकंदील साकारले.
तर कार्यशाळेच्या अंती मुलांनी तयार केलेले कंदील त्यांना भेट म्हणून देण्यात आला. त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी किल्ला तयार करणे, आकाश कंदील यासह विविध उपक्रम आम्ही घेत असतो असे आयोजकांनी सांगितले आहे.