वसई : गेल्या अनेक वर्षांपासून चिंचोटी कामण रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. वारंवार तक्रारी, आंदोलने करूनही प्रशासन ढिम्मच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी चिंचोटी ते कामण हा खड्डेमय रस्ता स्वखर्चाने बुजविण्याचा निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली आहे.वसई पूर्वेच्या भागातून चिंचोटी- कामण- भिवंडी राज्य मार्ग गेला आहे. या रस्त्याची मागील अनेक वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे अपघात ही घडतात.पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्त्याची आणखीनच बिकट अवस्था बनते.
या रस्त्यावर दीड ते दोन फूट इतके खोल खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे येथून ये जा करताना शाळकरी विद्यार्थी, कामगार वर्ग, मालवाहतूकदार यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात जेव्हा खड्डे पाण्याने भरतात तेव्हा त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. तर उंच सखल असा रस्ता असल्याने काही वेळा अवजड मालाचे वाहने कोसळण्याच्या घटना ही समोर येत आहेत. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सातत्याने मोठं मोठी आंदोलने झाली आहेत तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत.
परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने दिवसेंदिवस ही समस्या अधिक बिकट बनली आहे. रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून प्रवास करताना फारच कसरत करावी लागत आहे. अन्य वाहन चालक व दैनंदिन प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक यांचे तरच हाल होत आहे.प्रशासन जागे होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आता स्वतः रस्त्यावरून उतरून खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. युवा ग्रुप कामण यांच्या मार्फत हे काम केले जात आहे.खड्डे बुजविण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य व यंत्रणा सोबत घेऊन स्व खर्चाने ही कामे केली जात आहे.
आम्ही सतत सांगतो की रस्त्यावरील खड्डे बुजवा नागरिकांचे जीव जात आहेत.परंतु प्रशासन काही आमच्याकडे लक्ष देण्यास तयारच नाही. त्यामुळे आम्हाला कोणी वालीच उरला नाही.म्हणून आम्ही सर्व तरुणांनी एकत्र येत आपणच काही तरी केलं पाहिजे या हेतूने स्व खर्चाने खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला आहे. चिंचोटी ते कामण आणि नागले इथपर्यंत खड्डे दुरूस्त करण्याचे नियोजन आहे असे सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत म्हात्रे यांनी सांगितले आहे.
