वसई : विरार पूर्व रेल्वे स्थानक परिसरात वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्थानक परिसरात तातडीने सॅटीस प्रकल्प राबवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या काही वर्षांत विरार शहराची लोकसंख्या मोठ्या वेगाने वाढली आहे. दररोज हजारो प्रवासी विरार रेल्वे स्थानकाचा वापर करतात. मात्र, स्थानकाबाहेरील बेशिस्त वाहतूक व्यवस्था, प्रवाशांची अलोट गर्दी, रिक्षा-बस स्टँडचा गोंधळ आणि पादचाऱ्यांसाठी अपुऱ्या सुविधा यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती सुधारण्यासाठी शहरात सॅटीस प्रकल्प लागू करण्याची मागणी केली जात आहे.

वसई-विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी या संदर्भात आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यांनी विरार पूर्व परिसरातील सॅटीस प्रकल्पाची गरज अधोरेखित केली. या प्रकल्पासाठी तातडीने अहवाल तयार करणे, निधीची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे चौधरी यांनी सांगितले. तसेच, प्रकल्पासाठी जागा मोकळी करण्यासाठी जुनी नगर परिषद इमारत आणि पोलीस स्टेशनची इमारत तोडण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

सॅटीसचे फायदे काय?

सॅटीस प्रकल्पामुळे स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. या प्रकल्पातून प्रवाशांसाठी स्वतंत्र मार्ग आणि टर्मिनल, बस, रिक्षा, खासगी वाहनांसाठी योग्य पार्किंग आणि आगमन-निर्गमन व्यवस्था, तसेच पादचारी पूल व सायकल ट्रॅक सारख्या सुविधा निर्माण होतील. यामुळे वाहतुकीचा गोंधळ आणि अपघात टळतील, आणि स्थानक परिसराला ‘स्मार्ट सिटी’ व ‘क्लीन-स्मार्ट स्टेशन’ संकल्पनेला चालना मिळेल.

‘सॅटीस’ म्हणजे काय? ‘सॅटीस’ ही महाराष्ट्र पोलीस विभागाने विकसित केलेली एक आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आहे. या प्रणालीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे वाहन निरीक्षण, ई-चलान प्रणाली, डिजिटल मॉनिटरिंग आणि डेटा विश्लेषण, तसेच पोलीस कंट्रोल रूमशी थेट जोडणी या प्रमुख सुविधांचा समावेश आहे. यामुळे वाहतूक नियमांचे पालन, गुन्हेगारांवर जलद कारवाई, नागरिकांमध्ये शिस्त आणि वाहतूक विभागासाठी माहिती-आधारित निर्णय घेणे शक्य होते.