भाईंदर : मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील दिल्ली दरबार हॉटेल ते दहिसर टोल नाका या दरम्यान रखडलेले काँक्रिटीकरणाचे काम तब्बल तीन वर्षांनंतर अखेर सुरू झाले आहे. यामुळे पुढील काळात वाहनांचा प्रवास अधिक सुकर आणि सुसाट होण्यास मदत होणार आहे.

मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोल नाक्यापासून पालघरपर्यंत एकूण १२१ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले आहे. या कामांपैकी सध्या तब्बल ९७ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे. मात्र दहिसर टोल नाक्याजवळील सुमारे दीड किलोमीटरचा पट्टा रखडलेला असल्याने येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. परिणामी वाहनचालकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.तर या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची तीव्र समस्या जाणवत आहे.

यापूर्वी या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने व दुसरीकडे प्रचंड वाहतूक कोंडी असल्यामुळे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेणे कठीण झाले होते. तसेच वाहतूक पोलिसांनीही परवानगी दिली नव्हती. मात्र, आता परिस्थिती बदलत असून लवकरच दहिसर पथकर नाका वर्सोवा येथे स्थलांतरित होणार आहे. तसेच दहिसर–काशिगाव मेट्रो सेवा डिसेंबरपर्यंत सुरू होणार असल्याने भविष्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रस्त्याचे काँक्रिटीकरण टप्प्याटप्प्याने करण्यास सुरुवात केल्याचे महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.