वसई: गणेशोत्सव अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपला असताना वसईतही मूर्तिकारांची तसेच मूर्ती विक्रेत्यांची लगबग सुरु असल्याचे दिसून येत आहे. पण शासनाकडून वारंवार बदलण्यात येणाऱ्या नियामांमुळे मूर्तिकारांत आणि मूर्ती विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यंदा ऑगस्ट महिन्याच्या २६ तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागांत गणपतीच्या विविध प्रकारच्या मूर्तींनी सजलेले मंडप दिसून येत आहेत. तसेच, चित्रशाळांमध्येही दीड फुटापासून आठ फुटांपर्यंतच्या मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. वसईतील जूचंद्र, पापडी, उमेळमान यासह इतर ठिकाणच्यव कारखान्यांतून नागरिक गणपतीच्या मूर्ती बनवून घेतात, तर काही जण पेण, पनवेलहून मूर्ती मागवणाऱ्या विक्रेत्यांकडून तयार मूर्ती विकत घेतात. पण यंदा शासनाकडून गणपतीच्या मूर्ती विसर्जनासंबंधित आणि इतर नियमांमध्ये वारंवार करण्यात आलेल्या बदलांमुळे आणि त्या अनुषंगाने ग्राहकांकडून गणपतीच्या मूर्तींच्या मागणीत होणाऱ्या बदलामुळे मूर्ती विक्रेत्यांमध्ये आणि खासकरून मूर्तिकारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
९ जूनला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदी हटवल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. पण, मूर्तींच्या विसर्जनाबाबत सुनावणी बाकी होती. आम्ही जरी शाडूच्या मूर्ती घडवायला सुरुवात केली असली तरी नियम बदलतील कि काय हि धाकधूक कायम होती. मुंबई उच्च न्यायालयाने विसर्जनाबाबत दिलेल्या निर्णयामुळे ग्राहकांकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची मागणी वाढली. आम्ही काहींच्या ऑर्डर घेतल्या तर काही नाकाराव्या लागल्या, अशी प्रतिक्रिया मूर्तिकार कुणाल पाटील यांनी दिली.
गेल्या सोळा वर्षांपासून गणपतीच्या मूर्तींची विक्री करणारे चंद्रकांत पवार म्हणाले, मी पेणवरून मूर्ती मागवून त्यांची विक्री करतो. दरवर्षी २०० ते २५० मूर्ती मागवतो. यंदा लागू झालेल्या नियमांनुसार शाडूच्या मातीच्या मूर्ती जास्त मागवल्या होत्या. पण, अचानक नियमात बदल झाल्यामुळे आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची मागणी वाढली आहे. अवघा एक महिना गणेशोत्सवाला बाकी आहे आणि नव्या मूर्ती कारखान्यातून मागवणे कठीण आहे. असे त्यांनी सांगितले
मूर्तिकारांच्या आर्थिक भारात वाढ
अचानक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या मागणीत वाढ झाल्याने मूर्ती घडवण्यासाठी लागणारे साहित्य, जे मूर्तिकार आधीच साठवून ठेवतात, ते यावेळी चढ्या दराने विकत घ्यावे लागले, अशी प्रतिक्रिया मूर्तिकारांनी दिली. त्याचप्रमाणे, ५०० ऐवजी १००० रुपये असे दुप्पट मानधन देऊन नवे कारागीर नेमावे लागल्याने त्यांच्या आर्थिक भारात वाढ झाली आहे.
मूर्तींच्या किंमतीत वाढ
वसई विरार शहरात एक-दीड फूटापासून ८ फूट किंवा त्यापेक्षा मोठ्या मूर्ती साकारल्या जातात. यात यंदा शाडूच्या एक फुटाच्या मूर्तींच्या किंमतीत ४०० रुपयांनी तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या एक फुटाच्या मूर्तींच्या किंमतीत २०० रुपायांनी वाढ झाली आहे. ३ ते ४ लाखांना विकल्या जाणाऱ्या मोठ्या गणपतीच्या मूर्तींमध्येही २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे.