लसीकरण केंद्रावर गोंधळ सुरूच

वसई-विरार महापालिकेच्या लस वितरणातील गोंधळाचा फटका शुक्रवारी नागरिकांना बसला.

संतप्त नागरिकांकडून वरुण केंद्राची मोडतोड

वसई/विरार : वसई-विरार महापालिकेच्या लस वितरणातील गोंधळाचा फटका शुक्रवारी नागरिकांना बसला. शुक्रवारी ऐनवेळी पालिकेने तीन लसीकरण केंद्रांवर लशी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. नागरिकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या; परंतु दुपारी ३ पर्यंतही लस न आल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. यामध्ये वसई पूर्वेच्या वरुण इंडस्ट्री येथील केंद्राच्या प्रवेशद्वाराची नागरिकांनी मोडतोड केली.

पालिकेने  गुरुवारी प्रसिद्धीपत्रक काढून शुक्रवारी लस मिळणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र अचानक रात्री ११ वाजता सुधारित प्रसिद्धीपत्रक काढले आणि तीन केंद्रांवर साडेतीन हजार लशी मिळतील असे जाहीर केले. वसई पूर्वेकडील वरुण इंडस्ट्री  या केंद्रावर १ हजार लशी देणार असे जाहीर केले होते. त्यामुळे या केंद्रावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच केंद्रांवर भल्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. पहाटे ४ वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे होते. त्यांना १० वाजता दुपारी १ नंतर लस दिली जाणार असल्याचे सांगून घरी पाठविले; पण दुपारी ३ वाजले तरी या केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले नाही. यामुळे पहाटेपासून उभ्या असलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.  ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बसण्यासाठी वा पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नव्हती. त्यात पावसाच्या सरी अधूनमधून पडत असल्याने नागरिक हैराण झाले होते, अशी माहिती संकेत परब यांनी दिली. लसीकरण केंद्रावरील गैरसोयी, त्यात लस मिळत नसल्याने नागरिकांच्या संयमांचा बांध फुटला आणि त्यांनी गोंधळ घातला. काहींनी केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराची मोडतोड केली. अखेर सुरक्षारक्षकांच्या मदतीने जमावावर नियंत्रण मिळविण्यात आले.

विरारच्या बोळींज येथील माता बाल संगोपन केंद्रात ५०० लशी देण्यात येणार होत्या. त्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती; परंतु दुपारी ३ वाजले तरी लशी आल्या नव्हत्या. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली, अशी माहिती मिल्टन डिकोस्टा यांनी दिली. नालासोपारा पश्चिमेला नव्याने सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयातही तासन्तास रांगा लावून पुन्हा माघारी जावे लागले, असे येथील ज्योती या तरुणीने सांगितले.

या संदर्भात अधिक माहिती देताना वैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. धनंजय विश्वकर्मा यांनी सांगितले की, राज्याकडून लशी सकाळी ९ च्या दरम्यान येणार होत्या; पण त्या दुपारी उशिरा आल्याने लसीकरण करण्यास विलंब झाला, पण दुपारनंतर सर्व ठिकाणी लशी पोहोचल्या आणि सुरळीत लसीकरण सुरू झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Confusion continues at the vaccination centres ssh