भाईंदर : दहिसर पथकर नाक्याजवळील जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी  नवा पथकर नाका उभारण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होण्यासह खर्चाचीही बचत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबत पर्यायी तीन जागांची निवड करण्यात आली असून जागेची चाचपणी सुरू असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

दरम्यान, आता हा पथकर नाका स्थलांतरित करण्याऐवजी त्याच ठिकाणी असलेल्या पथकर नाक्याच्या  जुन्या जमिनीवर हलवण्याची मागणी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी केली आहे. सध्या ही जागा मुंबई महापालिकेकडून खासगी हॉटेल उभारणीसाठी भाड्याने देण्यात येणार आहे.

याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आली असली तरी अंतिम निर्णय प्रलंबित आहे. तसेच दहिसर टोल नाक्याची मुदतही २०२७ साली संपुष्टात येणार आहे. त्यामुळे याच ठिकाणी केवळ अवजड वाहनांसाठी पथकर नाका उभारल्यास वाहतूक कोंडीची समस्या कमी खर्चात मार्गी लागेल, असे हुसेन यांनी सांगितले आहे.