भाईंदर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली मिरा भाईंदर महापालिकेची प्रभाग रचना ही जनप्रतिनिधी कायद्याचा भंग करणारी असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, यात सुधारणा करून नवी प्रभाग रचना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोग, नगरविकास विभाग तसेच महापालिका आयुक्तांना काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी लेखी निवेदन दिले.आहे.यात मिरा भाईंदर शहराची विद्यमान लोकसंख्या १५ लाखांपेक्षा जास्त झाली असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत साधारण ८.५ लाख मतदार नोंदवले गेले आहेत. तरीदेखील नगरसेवकांची संख्या ९५ वरच ठेवण्यात आली असून त्यात वाढ करण्याची गरज आहे.त्यामुळे नवी प्रभाग रचना हीं २०२४ च्या मतदार नोंदणी व वास्तव लोकसंख्येवर आधारित असावी, प्रत्येक प्रभाग हा ३० ते ३५ हजार लोकसंख्येचा असावा तसेच एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोसाहन नियमावलीच्या नियमानुसार भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन वॉर्ड रचना व्हावी,असे त्यात म्हटले आहे.

४६ हकरती व सूचना

मिरा भाईंदर महापालिकेची प्रभाग रचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली होती.यावर नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली होती. त्यावरून १६ सप्टेंबर रोजी म्हणजे अखेरच्या दिवशी जवळपास ४६ हरकती व सूचना नोंदवण्यात आल्या आहेत.यावर लवकरच सुनावणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.