भाईंदर : घनकचरा प्रकल्पातून निघणाऱ्या कचऱ्याच्या लिच्छड (कचऱ्यातून निघणारा द्रव्य पदार्थ) ची योग्य साठवणूक करण्याकरिता डोंगरउतारावरील विविध ठिकाणी लिच्छड टाकी उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामुळे उत्तन येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत जाणारे लिच्छडचे पाणी रोखून ती जागा पुन्हा शेतीयोग्य करण्यास मोठी मदत होणार आहे.

भाईंदर पश्चिम परिसरात उत्तन हा समुद्रकिनाऱ्यालगत असलेला परिसर आहे. या भागात बऱ्याच ठिकाणी मोकळे मैदान आणि जंगल असल्यामुळे येथील स्थानिक नागरिक मासेमारीसह शेती करतात. मात्र २००९ साली महानगरपलिकेचा घनकचरा प्रकल्प हा उत्तन येथे सुरू करण्यात आल्याने अनेक अडचणींत वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी तब्बल १४ टन कचरा हा अद्याप प्रक्रियेविना पडून असल्यामुळे तेथे कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. त्यामुळे या साचलेल्या कचऱ्यातून लिच्छड हा निघत असून तो जवळील असलेल्या शेतजमिनीत जात आहे. याने संपूर्ण शेतजमीन नापीक होऊन शेतकऱ्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार समोर येत होती. त्यामुळे यावर तोडगा काढण्याकरिता आमदार गीता जैन यांनी आयुक्त दिलीप ढोले आणि संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शुक्रवारी घनकचरा प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी या निघणाऱ्या लिच्छडला अवकाळी येणारा पाऊस आणि ठप्प पडलेली प्रक्रिया जबाबदार असल्याचे समोर आले. त्यामुळे या भागातील पूर्वीपासून लिच्छडवर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या टाकीची व डोंगरउताराची पाहणी करून विविध तीन ठिकाणी नव्या टाक्या उभारण्याचे निदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू ठेवून परिसरात पसरलेल्या दुर्गंधीवर कायमच्या तोडग्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना आ. जैन यांनी दिल्या.

कचऱ्याचे डोंगर स्थलांतरित करणार!

उत्तन येथील घनकचरा प्रकल्प मधला काही काळ बंद ठेवण्यात आल्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे मोठे डोंगर उभे राहिले आहेत. या कचऱ्यावर बायो मायिनग प्रक्रिया करण्याचे काम पालिकेने मुंबई आयआयटीला दिले आहे. मात्र काही अडचणींमुळे अद्याप ते सुरू झालेले नाही. त्यामुळे या कामाला तात्काळ गती द्यावी व या कचऱ्यातून निघणाऱ्या लिच्छडला शेतजमिनीत जाण्यासून रोखण्याकरिता हे कचऱ्याचे डोंगर तात्काळ स्थलांतरित करण्याचे निर्देश आयुक्त दिलीप ढोले यांनी दिले आहेत.