‘ऑनलाइन’ दर्शननियम आदेशाला केराची टोपली
प्रसेनजीत इंगळे
विरार : यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये भाविकांना थेट दर्शनासाठी बंदी घालून केवळ ‘ऑनलाइन’ दर्शनासाठी परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पण शहरातील बहुतांश मंडळांनी या नियमाकडे पाठ फिरवली आहे. ‘ऑनलाइन’ दर्शनासाठी यंत्रणा उभारणे खर्चीक तसेच पुरेसा वेळ नसल्याने बहुतांश सार्वजनिक मंडळांनी या प्रणालीपासून दूर राहणे पसंत केले आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होऊ लागला असला तरी यंदाही खबरदारी म्हणून शासनाने गणेशोत्सवासाठी निर्बंध घातले होते. परंतु ऐनवेळी शासनाने सार्वजनिक मंडळांना थेट दर्शनासाठी बंदी घालून ‘ऑनलाइन’ दर्शनाची अट घातली होती. वसई-विरार शहरात जवळपास २५०० हून अधिक छोटे मोठे सार्वजनिक मंडळे आहेत. पण कुणीही सक्षम ‘ऑनलाइन’ दर्शनाची सोय केली नाही. यामुळे सार्वजनिक गणेश मंडळात उत्साह जरी असला तरी थेट दर्शनासाठी मज्जाव केल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. ‘ऑनलाइन’ दर्शनासाठी लागणाऱ्या यंत्रणा परवडत नसल्याने बहुतांश मंडळांनी ‘ऑनलाइन’ दर्शन प्रणालीकडे पाठ फिरवली आहे. शहरातील कोणत्याच मंडळाने अजूनही या यंत्रणा उभारल्या नाहीत, तर काही मंडळांनी समाज माध्यमांचा वापर करत तात्पुरती सोय केली आहे.
मागील दोन वर्षांपासून गणपती उत्सवावर करोना महासाथीचे सावट आहे. यामुळे अनेक मंडळांची आर्थिक स्थिती बेताची बनली आहे. त्यात अनेक मोठय़ा मंडळांनी करोनाकाळात विविध समाजसेवी कार्यक्रम राबविले. या उपक्रमांमुळे त्यांची बचत संपली तर या वर्षी वर्गणीदारांनी पाठ फिरवली. वर्गणीसाठी मंडळांना फिरता आले नाही.
काही मंडळांनी ‘ऑनलाइन’ वर्गणी गोळा करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला नागरिकांकडून अल्पसा प्रतिसाद मिळला. यामुळे उत्सव साजरा करताना अनेक मंडळानी हात आखडूनच आराखडा आखला होता. त्यात अचानक या ‘ऑनलाइन’ दर्शनचा भार पडल्याने. अनेक छोटय़ा छोटय़ा मंडळांच्या चिंता वाढल्या पैसे नसल्याचे कारण पुढे करत मंडळांनी ही यंत्रणा उभारली नाही. तर काही मंडळांनी ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘युटय़ूब’ अशा माध्यमांचा वापर केला आहे. पण यातही केवळ गणपतीच्या आरत्या ‘लाईव्ह’ केल्या जातात आणि त्यांच्या ‘िलक’ नागरिकांना पाठविल्या जात आहेत.
विरारमधील जलबाव वाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी माहिती दिली की, मंडळानी करोना काळात विविध समाजोपयोगी कामे केल्याने मंडळाची बचत कमी झाली आणि करोना काळात सदस्यांची आर्थिक स्थिती पाहता आम्ही समाजमाध्यमाच्या साहाय्याने नागरिकांना दर्शनाची सोय केली आहे. शहरातील इतर कुठल्याही मंडळांनी असा कोणताही प्रयोग केला नाही. अनेक ठिकाणी दर्शनासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्यात करोना नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे.
नालासोपारा परिसरातील मोरेगाव येथील वरद विनायक मित्र मंडळ, साई गणेश मित्र मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ, ओमकार मित्र मंडळ, विजय नगर परिसरातील शिवशाही मित्रमंडळ, आदर्श विनायक मित्र मंडळ, आचोळे परिसरातील ओम साई मित्र मंडळ, साई करोना मित्र मंडळ, राम रहीम मित्र मंडळ अशा मंडळांना भेट दिली असता या ठिकाणी ‘ऑनलाइन’ दर्शनाची सोय नसल्याचे आढळून आले.
माहितीच्या अभावामुळे गोंधळात वाढ
नालासोपारा परिसरातील दत्तनगर परिसरातील बाल मित्रमंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी माहिती दिली की, हे पहिलेच वर्ष असल्याने ही यंत्रणा कशी उभारावी याबाबत पूर्ण माहिती नाही. तसेच यावरील खर्च अधिक आहे. यामुळे आम्ही करोना नियम पाळून भाविकांना दर्शनचा लाभ देतो, तर वसईच्या महाराजा सार्वजनिक मंडळाचे विश्वस्त वैभव चेंडेकर यांनी माहिती दिली की, या वर्षी ही यंत्रणा उभारली नाही. पण आम्ही फेसबुकच्या माध्यमातून आरती लाईव्ह करतो. तसेच सध्या भाविकांची गर्दी नाही तरी जे भाविक दर्शनसाठी येतात यांना नाही म्हणता येत नाही. यामुळे मुखपट्टय़ा परिधान केलेल्या भाविकांना प्रवेश दिला जात आहे. त्यातही एका वेळी एकाच भाविकाला आत पाठविले जाते. पण मूर्तीच्या जवळ कुणालाही जाऊ दिले जात नाही.