Mira Bhayander Dahi Handi 2025 Celebration भाईंदर :- मिरा भाईंदर शहरात दहीहंडी निमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.दुपार नंतर ठिकठिकाणी मानाच्या हंडीला सलामी देण्यास सुरुवात केल्यामुळे नागरिक ते पाहण्यास गर्दी करत आहेत.
मिरा भाईंदर शहरात यंदा ४० ठिकाणी सार्वजनिक दहीहंडी उत्सवाच्या आयोजन करण्यात आले. यात विविध मंडळाने लाखाच्या घरात बक्षिसे ठेवली आहेत. त्यामुळे या दहीहंड्यांना सलामी देण्यासाठी शहरातील जवळपास ८० गोविंदा पथके शहरात फिरत आहेत. याशिवाय मुंबई तसेच वसई विरार शहरातील देखील गोविंदा पथके शहरात हजेरी लावली होती.
दरम्यान सकाळ पासून शहरात पावसाने देखील हजेरी लावल्यामुळे गोविंदा आनंदी झाले आहेत. आयोजनाकडून लावण्यात आलेल्या डीजेवर नाचत -गात आपला हा आनंद व्यक्त करत आहेत. तर गोविंदा पथकांचे मानवी मनोरे पाहण्यासाठी नागरिक देखील उत्सुक होऊन घरा बाहेर निघत आहेत. त्यामुळे कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी चौक- पोलीस बंदोबस्त चौकाचौकात तैनात केला आहे. याशिवाय यंदा पाहिलांदाच मोठ्या हंडीच्या स्थळी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.याशिवाय अग्निशमन दल, वैद्यकीय कर्मचारी देखील उपस्थितीत आहे. म्हणूनच संध्याकाळपर्यंत शहरातला एकही गोविंदा जखमी देखील झाला नसल्याची तक्रार पुढे आलेली नाही.
या हंड्यांचे विशेष आकर्षण
मिरा भाईंदर शहरात यंदा झा फॉउंडेशन तर्फे तब्बल ५१ लाखाच्या हंडीचे आयोजन करण्यात आले होते.त्यामुळे या ठिकाणी जवळपास सर्वच गोविंदा पथकांनी हजेरी लावली.तर नवघरच्या मैदानात पहिल्यांदाच प्रताप सरनाईकांच्या संस्कृती फाउंडेशनची हंडी उभारण्यात आल्याने गोविंदा प्रेमी आवरून तिथे जात होते.याशिवाय मिरा रोड येथे मनसेने मराठी मानाची हंडी उभारल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरत होती.तसेच बऱ्याच ठिकाणी उंच हंडी, भरघोस बक्षिसे आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे नागरिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली.
गोविंदामार्फत अमली पदार्थविरोधी जनजागृती
मिरा भाईंदर शहरात गोविंदा पथकांमार्फत मानवी मनोरे उभारले जात होते. तरुणांमध्ये दहीहंडीबद्दल असलेला उत्साह पाहून याच माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केला. त्यांनी तरुणांमार्फत पहिल्यांदाच हातात जाहिरात फलक घेऊन चार थरांचा मानवी मनोरा उभारला.