भाईंदर : परिवहन मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्यात अपयश आले आहे. परिणामी प्रशासकीय यंत्रणेसह मंत्र्यांनी पथकर नाक्याची पाहणी करून आता १३ नोव्हेंबरची नवी मुदत दिली आहे. वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे सदर पथकर नाक्यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर योग्य जागेचा शोध घेण्याच्या सूचना शासकीय यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासकीय पातळीवर निश्चित केल्या जाणाऱ्या जागांवर स्थानिक भूमिपुत्र संघटनांसह भाजप पक्षाने विरोध दर्शवला आहे. परिणामी दहिसर पथकर नाक्याच्या स्थलांतरावरून महायुतीत अंतर्गत तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, सदर पथकर नाका ८ नोव्हेंबर रोजी स्थलांतरित होणार असल्याचा दावा काही दिवसांपूर्वीच परिवहन मंत्र्यांनी केला होता. त्यामुळे या दिवसाकडे प्रवाशांसह सर्व नागरिकांचे लक्ष लागले होते. मात्र दिवस उजाडल्यानंतरही पथकर नाका स्थलांतरित झाला नाही. त्यामुळे पुन्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनासह पथकर नाक्याची पाहणी केली.यावेळी पथकर नाका स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून आले. मात्र काही कामे अद्याप अपूर्ण असल्याचा दावा सरनाईक यांनी पाहणीदरम्यान केला. तसेच येत्या १३ नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. “जर पुन्हा या पथकर नाक्याच्या स्थलांतरात अडथळे आले, तर आपण शिवसेना शैलीत आंदोलन करू,” असा इशाराही सरनाईक यांनी यावेळी दिला.

वर्सोवा पुलापलीकडे नवी जागा?

दहिसर पथकर नाका मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलापुढे गिरनार हॉटेलजवळ उभारण्याचा विचार सुरू आहे. शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह या जागेची पाहणी केली. मात्र या निर्णयामुळे स्थानिक गावकरी नाराज झाले आहेत. सदर ठिकाणी टोलनाका उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे सांगत स्थानिक भूमिपुत्र संघटनेने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

मंत्र्यासमोरच प्रवाशांचा संताप

मुंबई–अहमदाबाद महामार्गावर दहिसर पथकर नाक्याच्या स्थलांतरासाठी जागेची पाहणी करण्यासाठी प्रताप सरनाईक गेले होते. मात्र त्याच वेळी वसईहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्याच्या कडेला काही स्थानिक गावकरी व प्रवासी उभे होते. यावेळी काही प्रवाशांनी मंत्र्यांकडे थेट पाहूनच “आधी रस्त्याचे काम करा, मग पुढील कामे करा “असे उद्गार काढले.