वसई-विरार महापालिका आता लवकर केंद्र शासनाच्या डीजी लॉकर अ‍ॅपमध्ये दिसणार आहे. यामुळे नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले, मालमत्ता कर, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आदी विविध दाखले ई स्वरूपात जतन करता येणार आहेत.आधार कार्ड, पॅन कार्डपासून विविध प्रकारचे शैक्षणिक आणि इतर दाखले ई स्वरूपात जतन करून ठेवण्यासाठी डिजिटल लॉकर अर्थात डीजी लॉकर हे अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून हे अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. संबंधित विभागाकडून नागरिकांचे दाखले, प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे पडताळणी करून या डीजी लॉकरमध्ये असतात. देशातील अनेक शासकीय संस्था, महापालिका या डीजी लॉकरची सुविधा नागरिकांना देत आहेत. वसई-विरार महापालिकासुद्धा आता डीजी लॉकरची सुविधा देणार आहे.

मंगळवारी या संदर्भात डीजी लॉकरच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत पालिकेला मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात वसई विरारच्या नागरिकांना या डीजी लॉकरमध्ये जन्म आणि मृत्यू दाखला, मालमत्ता कर भरल्याचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, भोगवटा दाखले जतन (सेव्ह) करता येणार आहेत. पुढील काही दिवसांतच याविषयीच्या तांत्रिक बाबी पूर्ण होणार असून ते नागरिकांना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (माहिती तंत्रज्ञान) समीर भूमकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे डीजी लॉकर?
केंद्र शासनाने २०१५ मध्ये डीजी लॉकर अर्थात डिजिटल लॉकर ही सेवा एका अ‍ॅपच्या माध्यमाद्वारे सुरू केली आहे. या अ‍ॅपमध्ये नागरिक आपल्या सर्व प्रकारची कागदपत्रे, परवाने, प्रमाणपत्रे, दाखले ठेवू शकतात. त्यामुळे कुठेही अर्ज करताना, आपली ओळख देताना कागदपत्रे सोबत न देता डीजी लॉकरमधील प्रत दाखवता येते. त्याला केंद्र शासनाची अधिकृत मान्यता असल्याने डीजी लॉकरमधील कागदपत्रे ग्राह्य धरली जातात. ही कागदपत्रे अधिकृत असतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, विमा कागदपत्रे आदी दैंनंदिन व्यवहारात नियमित लागणारे दाखले आणि प्रमाणपत्रे या डीजी लॉकरमध्ये साठवून ठेवण्याची सोय आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाला १ जीबीपर्यंत कागदपत्रे ठेवण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.