वसई : मिरा भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपायानेच महिलांच्या डब्यात मद्याच्या नशेत अश्लील गैरवर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शनिवारी दुपारी बोरीवली ते विरार या लोकल मध्ये ही घटना घडली. अमोल सकपाळ असे या पोलीस शिपायाचे नाव असून त्याच्या विरुद्ध वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई अमोल किशोर सपकाळ हा मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास बोरिवलीवरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल मध्ये तो मिरारोड स्थानकात चढला. यावेळी सकपाळ हा मद्याच्या नशेत होता. याच दरम्यान त्यांनी महिलांशी अश्लील वर्तणूक करण्यास सुरुवात केली होती.
याशिवाय सीटवर बसून काही महिलांना तिकीट विचारण्याचा प्रयत्न, तसेच महिलांकडे घाणेरड्या नजरेने बघत होता. इतकेच नव्हे तर काही महिलांचे मोबाईल फोन हिसकावून घेतल्याचाही आरोप महिलांनी केला आहे. यानंतर कंटाळलेल्या महिलांनी या पोलीस शिपायाला नायगाव स्थानकात त्याला जबरदस्ती उतरवले व स्टेशन मास्तरकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर स्टेशन मास्तरने वसई रोड रेल्वे पोलिसांना बोलावून घेतले.त्यानंतर प्रवाशी महिलांनी वसई पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात वसईच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रात दाखल केली आहे.या तक्रारीवरून पोलीस शिपायावर गुन्हा दाखल केला आहे. व पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली आहे.
महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर लोकल मध्ये महिलांच्या डब्ब्यात मारहाण, छेडछाड असे प्रकार सातत्याने समोर येत आहे. आता तर एका पोलीस शिपायानेच दारूच्या नशेत महिलांवर अश्लील वर्तनामुळे महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वेतील महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर वर्दीत असलेले पोलीसच असे कृत्य करीत असतील तर मग विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.