वसई : पर्यावरण पूरक सजावटी सोबतच आता गणेशोत्सवात गणपतीसाठी नैसर्गिक विविधरंगी फुलांपासून तयार केलेल्या फुलांच्या कंठ्यांचा ट्रेंड आता पहायला मिळत आहे.त्यामुळे सध्या बाजारात रंगीबेरंगी आणि आकर्षक अशा फुलांच्या कंठ्याना चांगलीच मागणी वाढू लागली आहे.बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. गणेश मूर्ती अधिक सुबक दिसावी यासाठी गणपतीच्या गळ्यात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी अशा कंठ घातल्या जातात. मागील काही वर्षांपासून मोत्यांच्या कंठ्या पाठोपाठ आता फुलांपासून तयार करण्यात आलेल्या कंठ्यांचा ट्रेंड सर्वत्र दिसून येत आहे.
विविध रंगांच्या नैसर्गिक फुलांचा वापर करून पर्यावरणपूरक अशा कंठ्या तयार करण्याचे काम फ्लोअर आर्टीट्स करू लागले आहे. यात शेवंती, गुलाब,ऑर्किड, अष्टर, मोगरा, झिपरी, तगर, जिप्सी, अशा फुलांचा वापर करून फुल व्यवस्थित पणे एकात गुंफून कंठी तयार केली जात आहे. डिझाईन नुसार कंठी तयार करण्यासाठी दोन ते अडीच तास इतका कालावधी लागत असल्याचे फ्लोअर आर्टिस्टने सांगितले आहे. आता बाप्पांच्या मूर्त्यांना नैसर्गिक फुलांच्या कंठीमुळे मूर्तीची शोभा अधिकच वाढत असल्याने अनेक ग्राहक विविधरंगी फुलांपासून तयार केलेल्या कंठीला पसंती दिली जात आहे.
फुलांच्या कंठ्यांची फॅशन आता जोरात सुरू आहे. त्यामुळे गौरी गणपतीसाठी फुलांची कलाकुसर असलेल्या कंठ्यांची मागणी ग्राहक करीत आहेत असे फ्लोअर आर्टिस्ट सायली तरे यांनी सांगितले. त्यामुळे एकप्रकारे हाही एक पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा भाग ठरू लागला आहे.
कंठ्यांच्या किंमतीत वाढ
सणासुदीच्या फुलांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कंठ्यांच्या किंमतीही वाढल्या आहेत. एक ते दीड फुटांची कंठी ३५० पासून ते २५०० रुपयांपर्यँत विकली जाते विविध कलाकृतीनुसार व त्यात वापर होणारी फुलं त्यानुसार त्यांचे दर लावले जात आहेत. यावर्षी साधारपणे शंभर ते दोनशे रुपये इतकी वाढ झाली आहे.
मुलींचा फ्लोअर आर्ट शिकण्याकडे कल वाढला
मेकअप आर्टिस्ट प्रमाणे आता फ्लोअर आर्ट कला शिकण्याकडे ही कलाकारांचा कल अधिकच वाढला आहे. लग्नसराई, बेबी शॉवर व सणासुदीच्या काळात विविध फुलांपासून तयार करण्यात येत असलेल्या दागिन्यांची फॅशन तयार झाली असल्याने त्याला अधिक मागणी असते यातून या कलाकारांना चांगला रोजगार ही मिळू लागला आहे. विशेषतः गणेशोत्सवात तयार करण्यात येत असलेल्या कंठ्यांना व गौराईसाठी लागणाऱ्या वेण्यांना चांगली मागणी असते असे फ्लोअर आर्टिस्ट यांनी सांगितले आहे.