वसई : विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी ईडीने मंगळवारी छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी नाशिक येथील त्यांच्या पुतण्याकडून १ कोटी ३३ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या प्रकरणानंतर ईडीने पवार व त्यांच्या पत्नी भारती पवार यांना समन्स बजावले आहे. सोमवारी ४ ऑगस्टला त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारती प्रकरण घोटाळ्यानंतर वसई विरार शहरात सक्तवसुली संचनालयाचे (ईडी) धाड सत्र सुरू आहे. सुरवातीला सक्तवसुली संचलनालयाने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉंड्रींग कायद्याअन्वये भूमाफियांसह तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या हैद्राबाद येथील घरावर छापे घातले होते. यात रेड्डी यांच्याकडे कोट्यावधी रुपयांचे घबाड हाती लागले होते. त्यापाठोपाठ २९ जुलैला ईडीने याप्रकरणी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात १ कोटी ३३ लाख रुपये व कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
याशिवाय ईडीने केलेल्या तपासात शहरात बांधकाम व्यावसायिकांकडून परवानगी देण्यासाठी प्रति चौरस फुटा मागे पैसे घेतले जात होते. यात अनिलकुमार पवार यांना फुटा मागे २५ रुपये तर नगररचना संचालक यांना १० रुपये अशा स्वरूपात एकूण ३५ रुपये प्रतिचौरस फुटामागे आकारले जात असल्याचे ईडी तपासात निष्पन्न झाले आहे. यातून आयुक्तांनी कोट्यावधी रुपायंची माया जमवली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याची सखोल चौकशी करण्यासाठी ईडी ने आता माजी आयुक्त अनिलकुमार पवार व त्यांच्या पत्नी भारती पवार यांना समन्स बजावले आहेत.सोमवारी ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबई वरळी येथील सक्तवसुली संचनालयाच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चौकशीत ईडीच्या हाती काय लागणार ?
वसई विरार शहरातील बांधकाम घोटाळा उघड झाल्यानंतर त्यात पालिकेचे माजी आयुक्त, तत्कालीन नगररचना यासह पालिकेचे अन्य अधिकारी यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पुढील चौकशीत काय निष्पन्न होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.