भाईंदर : सोमवारी मिरा भाईंदर शहरात बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी मिरा भाईंदर शहरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. तर, सोहळ्यादरम्यान त्यांनी केलेली डायलॉगबाजी, विरोधी पक्षांवर केलेली टीका अशा बऱ्याच चित्रफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या. यात सर्वात चचेर्चा विषय ठरलेली चित्रफित म्हणजे शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत उपमुख्यमंत्र्यांनी मिरा भाईंदर महापालिका आयुक्तांचा घेतलेला समाचार.

पण, ही या चित्रफितीवरून सुरू असणारी चर्चा थांबते न थांबते तोवर आणखी एक चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल होताना दिसली. यात ज्या महापालिका आयुक्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकारले होते. त्यांचाच ते सत्कार करताना दिसले. त्यामुळे एकनाथ शिंदेंची नेमकी भूमिका काय? असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

भाईंदरमध्ये नव्याने उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी मिरा भाईंदर शहरात आले होते. शिंदेच्या स्वागतासाठी शिवसेना तसेच महापालिका प्रशासनाने मोठी तयारी केली होती. याच कलादालनाच्या आसपासचा परिसर स्वच्छ करून रस्ते दुरुस्ती व इतर काम यावेळी करण्यात आली होती. मात्र, घटनास्थळी पोहोचताच गाडीतून उतरताच शिंदे यांनी शहरात पडलेल्या खड्ड्यांबाबत मिरा भाईंदर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्यापुढे नाराजी व्यक्त केली.

व्हायरल झालेल्या चित्रफितीमध्ये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट आयुक्त शर्मा यांची कान उघडणी करताना दिसत आहेत. “रस्त्याच्या एका बाजूचे खड्डे दुरुस्त केले आहेत आणि दुसऱ्या बाजूचे खड्डे मात्र दुरुस्त केलेले नाहीत,” असे म्हणत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आपला प्रवासही अडचणीचा झाला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.यावर आयुक्त शर्मा यांनी शहरात खड्डे भरण्याचे काम करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, शिंदे यांनी लगेचच आक्षेप घेत, “रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, भरलेल्या खड्ड्यांवर वाहनांचा प्रवास झाल्यामुळे ते देखील आता एकसमान राहिलेले नाहीत. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे”, असे सुनावले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही चित्रफित व्हायरल होताच. नेटकऱ्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. मात्र, दुसऱ्याच क्षणाला ज्या आयुक्तांवर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आगपाखड केली. त्यांचाच उपमुख्यमंत्र्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्ड्यांबाबत व्यक्त केलेली कळकळ खरी की फक्त दिखावा असा सवाल नेटकरी उपस्थित करताना दिसत आहेत.