वसई: एकेकाळी विविध प्रकारच्या फुलांनी बहरणारी  वसईतील फुलशेती आता वातावरणातील लहरीपणामुळे संकटात सापडू लागली आहे. मागील काही महिन्यांपासून सोनचाफा, मोगरा यासह इतर फुलांचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. उत्पादन कमी निघत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

वसईच्या विविध ठिकाणच्या भागात फुलांची लागवड करणारे शेतकरी आहेत. चाफा,  मोगरा,सायली,जुई, तगर, गुलाब, जास्वंद, नेवाली अशा विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. या फुलांना मुंबईच्या फुल बाजारात चांगली मागणी असते. विशेषतः सणासुदीच्या काळात फुलांना बाजारात चांगली मागणी असते.

मात्र मागील काही महिन्यांपासून हवामानात बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे फुलांचे निघणारे उत्पादन हे फारच कमी झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

चाफा हे बारमाही पिक असल्यामुळे बहुतांश शेतकरी चाफ्याच्या फुलांची लागवड करतात. परंतु मागील वर्षांपासून चाफ्याचे निघणारे उत्पादन हे अचानकपणे घटू लागले आहे. अक्षरशः हे उत्पादन निम्म्यावर आले आहे. केवळ चाफाच असे नाही तर मोगरा व इतर फुलांच्या उत्पादन कमी झाले असल्याचे फुलउत्पादक शेतकरी किरण पाटील यांनी सांगितले आहे. मे मध्ये अधिक उष्णता जाणवते ती अगदी मार्च महिन्यापासूनच सुरू झाली असल्याने त्याचा फुल उत्पादनावावर परिणाम झाला आहे. ज्या ठिकाणी एका वेळी आठ ते दहा हजार असा चाफा निघत होता तिथे जेमतेम चार ते पाच हजार इतकाच निघत आहे असेही पाटील यांनी सांगितले आहे.

मागील काही वर्षांपासून एक एक फुलांच्या प्रजातींचे उत्पादन कमी होत आहे. आधी मोगरा खूप होता तो कमी झाला म्हणून आम्ही चाफा निवडला आता त्याचे ही उत्पादन सातत्याने घटत आहे असे वसईचे फुलउत्पादक शेतकरी सुभाष भट्टे यांनी सांगितले आहे.

संशोधन होऊन तोडगा निघायला हवा

विविध ठिकाणच्या भागात शेतीच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या समस्यांवर तेथील समस्या जाणून त्यावर कृषी विभागाकडून संशोधन करून उपाय सुचविले जातात. मात्र वसई विरार मध्ये फुल शेती, भाजी पाळा याबाबत योग्य ते संशोधन होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही

 फुलांची परिस्थिती, उत्पादनात घट होण्याची कारणे, त्यावर आवश्यक उपाययोजना सुचविणे गरजेचे आहे असे शेतकरी सुभाष भट्टे यांनी सांगितले आहे.

मजुरांची कमतरता

वसईच्या भागात शेती वाडी मध्ये काम करण्यासाठी आता मजुरांची कमतरता भासू लागली आहे.  सुरवातीला मोठ्या संख्येने मजूर शेती वाडीत काम करण्यासाठी येत होते. आता कोणीच येत नाही यासाठी शोध घ्यावा लागतो. आणि मिळाला तरी त्यांची मजुरी सहाशे ते आठशेच्या घरात जाते मग ते ही परवड नसल्याने मोठ्या अडचणी येतात असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

फुलांचे  भाव वधारले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सद्यस्थितीत विविध ठिकाणी चैत्र यात्रोत्सव व लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बाजारात फुलांना चांगली मागणी आहे. परंतु उत्पादन कमी निघत असल्याने फुलांचे दरात ही २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. चाफा १०० ते१५० रुपये शेकडा, जास्वंद १०० ते १२० शेकडा, गुलाब १०० रुपये शेकडा,मोगरा ३०० रुपये किलो, सायली २०० रुपये किलो अशा भावाने विकली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.