वसई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि ठिकठिकाणी तयार झालेले उंचवटे यामुळे आधीच नागरिक त्रस्त असताना. आता रस्त्यावरील तुटलेले रबरी गतिरोधकही वाहतुकीस मोठा अडथळा ठरू लागले आहेत.

वसई विरार शहरात वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन भरधाव वाहनांच्या वेगाला नियंत्रित करण्यासाठी महापालिकेकडून ठिकठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले आहेत. यात आता काही ठिकाणी डांबरी व सिमेंट काँक्रीटच्या गतिरोधकांची जागा रबरी गतिरोधकांनी घेतली आहे. ठरविक उंचीचे हे रबरी गतिरोधक नट-बोल्टच्या सहाय्याने रस्त्यात बसवण्यात आले आहेत. पण महापालिकेकडून झालेल्या दुर्लक्षामुळे आणि देखभालीअभावी हे गतीरोधक झिजलेल्या, तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. काही ठिकाणी गतिरोधकांमधील नट-बोल्ट अर्धवट बाहेर आलेले आहेत. तर काही ठिकाणी या गतिरोधकांची दुरवस्था झाली आहे.

या तुटलेल्या गतिरोधकांमधून वाहन काढताना वाहनचालकांना आणि खासकरून दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच तुटलेल्या गतिरोधकांमुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे असे वाहनचालक निलेश कोळेकर यांनी सांगितले आहे.
या सर्व प्रकारामुळे महापालिकेच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अलीकडेच समोर आलेल्या विविध घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर, या रस्ते कामांसह इतर सर्व कामांचीही चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे.