वसई : ‘आफताब माझा खून करेल आणि माझे तुकडे करून मला फेकून देईल,’ अशा आशयाचे श्रद्धा वालकरने २०२० साली पोलिसांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. या पत्राच्या आधारे नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी दोन वेळा श्रद्धाचा जबाब घेतला होता. मात्र आपण रागाच्या भरात तक्रार केली होती, आता वाद मिटल्याचे तिने सांगितल्याने पोलिसांनी प्रकरण निकाली काढल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रध्दा वालकर हत्या प्रकरणात बुधवारी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. आफताब श्रध्दाला नेहमी मारहाण करत होता. २०२०मध्ये त्याने श्रध्दाला बेदम मारहाण केली होती. यावेळी तीन दिवस ती रुग्णालयात उपचार घेत होती. त्यादरम्यान २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रध्दाने नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्यात आफताब विरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आफताब माझी हत्या करून माझ्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून देणार असल्याचे तिने म्हटले होते. दीड वर्षांनी श्रध्दाची ही भीती खरी ठरली. मे २०२२ मध्ये आफताबने दिल्लीमध्ये तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून इतस्तत: फेकले. श्रध्दाने त्यावेळी तक्रार मागे घेतली नसती तर आज कदाचित तिचा जीव वाचला असता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले, की श्रध्दाच्या अर्जानुसार आम्ही कारवाई सुरू केली होती. आम्ही दोघांना बोलावून चौकशी केली, पालकांनाही बोलावून समज दिली होती. ही प्रक्रिया २६ दिवस सुरू होती. मात्र अचानक श्रध्दा आणि आफताब यांनी सामंजस्याने तोडगा काढल्याचे सांगत तक्रार मागे घेतली गेली. तिने १२ डिसेंबर रोजी तक्रार मागे घेतल्याने आम्ही अर्ज निकाली काढला असे कांबळे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप निराधार असल्याचे ते म्हणाले.

आफताबची आज ‘नार्को’ चाचणी?

नवी दिल्ली : आफताब पूनावालाची नार्को चाचणी गुरुवारी होण्याची शक्यता आहे. चाचणीपूर्वी त्याची भावनिक-मानसिक क्षमता तपासणीसाठीच्या चाचण्या करण्यात येतील. मानसिक क्षमता नीट न आढळल्यास व तो अस्वस्थ असल्याचे जाणवल्यास नार्को विश्लेषण चाचणी करण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पान ५

श्रद्धा वालकर हिने २०२० मध्ये लिहिलेले पत्र मी पाहिले. त्यावर तेव्हा कारवाई का झाली नाही, याचा तपास केला जाईल. वेळेत कारवाई झाली असती तर कदाचित श्रद्धाचे प्राण वाचू शकले असते.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First complaint aftab withdrawn two years ago shraddha letters police ysh
First published on: 24-11-2022 at 00:02 IST