वसई : मागील काही वर्षांपासून वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. एकीकडे पोलीस ठाणे हे स्थानकापासून दूरच्या अंतरावर असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर दुसरीकडेमागील चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पोलीस ठाण्यात पुराचे पाणी शिरले आहे.
वसई पश्चिमेतील रेल्वेच्या वसाहतीमध्ये हे लोहमार्ग पोलीस ठाणे आहे. मिरारोड ते वैतरणा अशी लोहमार्ग पोलिसांची हद्द आहे. यामध्ये एकूण सात स्थानकांचा समावेश होतो. पंरतु या संपूर्ण परिसरासाठी वसई येथे केवळ एकच लोहमार्ग पोलीस ठाणे आहे. विविध स्थानाकांत घडणारे गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी प्रवासी नागरिकांना वसईच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात येत असतात. मागील चार दिवसांपासून वसई विरार शहरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पुरस्थितीची समस्या निर्माण झाली आहे. याचा फटका हा वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याला बसला आहे.या पोलीस ठाण्यात ही पावसाचे पाणी शिरले आहे. पोलीस ठाण्यासह आजूबाजूच्या भागात मागील दोन दिवसांपासून गुडघाभर पाणी साचून राहिले आहे
अशा प्रकारे पाणी साचून राहिल्याने याठिकाणी ये जा करणारे कर्मचारी व प्रवासी यांनाही अडचणी निर्माण झाल्या आहेत. येथील पोलीस कर्मचाऱ्यांना तर अक्षरशः गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागतो. तर दुसरीकडे पोलीस ठाण्यात पावसाचे पाणी शिरलेअसल्याने अनेक महत्त्वाची कागदपत्रे व दस्तऐवज पाण्यात भिजून मोठे नुकसान होण्याची भीती आहे. तसेच इतर मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.