वाहतूक कोंडीचे विघ्न; भुयारीमार्ग तयार करण्याची नागरिकांची मागणी

वसई: नायगाव पूर्वेतील जूचंद्र परिसरात असलेल्या एल सी क्रमांक ९ या रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या  कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

नायगाव पूर्वेकडील बाजूस जूचंद्र परिसर आहे. त्या भागातून बाफाणे ते नायगाव असा नायगाव स्थानक व महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता गेला आहे या रस्त्याच्या मधूनच वसई ते दिवा लोहमार्ग गेलेला आहे त्या लोहमार्गावरून मालवाहतूक गाडय़ा व प्रवासी वाहतूक गाडय़ा सुरू असतात. यासाठी जुचंद्र येथे रेल्वे फाटक बसविण्यात आले आहे. मात्र मालवाहतूक गाडय़ा व प्रवासी वाहतूक गाडय़ा यांची संख्या वाढली असल्याने फाटक हे वारंवार बंद करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे वाहनांची संख्याही भरमसाट वाढली असल्याने फाटक बंद झाल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. यावर उपाययोजना म्हणून या भागात उड्डाण पूल तयार करण्यात येत आहे.

सुरुवातीला चार पदरी उड्डाण पूल तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र ग्रामस्थांचा झालेल्या विरोधानंतर हा पूल दोन पदरी करण्यात येत आहे. करोना काळात या पुलाचे काम हे रखडले होते. करोनाचा प्रादुर्भाव निवळताच पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात केली आहे. तयार करण्यात येणारा पूल हा १ हजार २९० मीटर लांबीचा असून त्यासाठी ८४ कोटी रुपये इतका निधी मंजूर केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. सध्या रस्त्याचे रुंदीकरण  पूर्ण करून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच आजूबाजूच्या भागाचे सर्वेक्षण व त्यानुसार तयार आराखडे तयार करण्यात आले असून पुलासाठी लागणारे कॉलमचे काम पूर्ण करून कामाला गती दिली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. तसेच याबाबत केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देण्यात आले असल्याची माहिती रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी सांगितले.

भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी

जूचंद्र येथील रेल्वे फाटकावर सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात केली आहे. परंतु जूचंद्र तथा आसपासच्या अनेक गावांतील नागिरकांच्या रहदारीसाठी व हलक्या वाहनांसाठी या ठिकाणी भुयरी मार्ग ( सबवे) बांधणे अत्यावश्यक आहे.  जूचंद्र विभागाला आसपासची ९ ते १० गावे व्यापार, उद्योगधंदे, बाजार, शाळा, कॉलेज व इतर विविध कामानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून जोडली गेलेली आहेत. परंतु उड्डाणपुलामुळे आसपासच्या नागरिकांना दरवेळी अंदाजे १ किलोमीटरचा वळसा घालून ये—जा करावी लागेल. दररोज अंदाजे २ ते ३ हजार वाहनांना वळसा घालावा लागेल. यासाठी हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात यावा अशी मागणी रेल्वे बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याकडे नागरिकांनी पत्राद्वारे केली आहे.

कोंडीत भर

जूचंद्र रेल्वे फाटकावर निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दररोज रेल्वे फाटक हे दिवसातून ३० ते ३५ वेळा बंद होत असते. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असते. वाहनांची संख्या ही अधिक असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यातच आता उड्डाणपुलाचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत आणखीन भर पडण्याची शक्यता आहे.

जूचंद्र रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाचे काम सुरू केले आहे. सध्या एका बाजूचे रस्तेरुंदीकरण करून पुढील काम सुरू करण्यात येत आहे. लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशांत ठाकरे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वसई.