भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील मुख्य मार्गांवर मेट्रोसोबत उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलांची अवघ्या वर्षभरातच दुरवस्था झाली आहे. पुलावर खड्डे पडले असून निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.मिरा-भाईंदर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मागील सहा वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) दहिसर-मिराभाईंदर मेट्रो क्रमांक ९ चे काम सुरू आहे. हे काम येत्या काही महिन्यांत पूर्ण होणार आहे.

याशिवाय याच मार्गांवर काशिमीरा ते गोल्डन नेस्ट दरम्यान तीन उड्डाण पुलांची उभारणी करण्यात येत आहे. त्यापैकी दोन पूल पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले असून आणखी एका पुलाचे काम सुरू आहे.दरम्यान, ब्रँड फॅक्टरी ते एस. के. स्टोनपर्यंतच्या पुलाचे लोकार्पण ऑगस्ट २०२४ मध्ये करण्यात आले होते. मात्र अवघ्या वर्षभरातच या पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पुलावर खड्डे पडले असून पावसाच्या वेळी पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, आता या मार्गावरील डांबरीकरणाचा थरही निघू लागला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी एमएमआरडीएकडे करण्यात आली आहे. या संदर्भात अदयापही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र असे काही प्रकार आढळल्यास त्यावर सकारात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.