वसई : अनधिकृत बांधकाम केलेल्या गाळ्यात अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना चालविला जात असल्याचे मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले होते. गुरुवारी वनविभाग, महापालिका आणि पोलीस यांच्या पथकाने यावर कारवाई करून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले आहे.
वसई विरार शहरात व शहराला लागूनच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. यात उद्योग कारखाने त्यात बसविण्याच्या दृष्टीने गाळे, पत्र्यांचे मोठं मोठे शेड तयार करून अनधिकृत बांधकामे उभारण्यात येत आहेत. नुकताच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या नालासोपारा पेल्हार परिसरातील रशीद कंपाऊंड मध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकून एका रासायनिक कारखान्याच्या नावाखाली चालणाऱ्या एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या युनिटचा पर्दाफाश करत १४ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते.
अमली पदार्थ तयार करण्यात येत असलेला कारखाना हा अनधिकृत पणे उभारण्यात आलेल्या गाळ्यात सुरू असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत निष्पन्न झाले होते. या घटनेनंतर तातडीने पालिकेने घटनास्थळाची पाहणी केली होती. मात्र कारखाना उभी असलेली जागा वनविभागाच्या मालकीची असल्याने त्यावर कारवाईसाठी पालिकेने वनविभागाला पत्र पाठविले होते. त्यानुसार गुरुवारी वनविभागाचे अधिकारी, महापालिका व पोलीस प्रशासन यांच्या मार्फत संयुक्तिक कारवाई करण्यात आली आहे. यात तीन गाळे व पत्र्याचे शेड असे हजारो चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले आहे.
