सुहास बिऱ्हाडे

वसई:  वसई-विरार महापालिकेचा माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनील वाडकर केवळ १२ वी पास आहे. मला पत्नीने डॉक्टर बनवून पालिकेत नोकरीला लावले आणि मी केवळ पैसा कमावला, अशी कबुली वाडकरने पोलिसांना दिली.वसई-विरार शहरात खळबळ उडवून देणारा महापालिकेचा माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनील वाडकर सध्या तुळींज पोलिसांच्या कोठडीत आहे. वाडकर हा तोतया डॉक्टर बनून २००७ मध्ये तत्कालीन वसई नगर परिषेदत शिरला होता. त्याची पत्नी डॉ. आरती वाडकरकडे त्या वेळी पालिकेत आरोग्य विभागात कर्मचारी भरण्याचे कंत्राट होते. तिने पती वाडकर हा एमबीबीएस असल्याचे भासवून पालिकेत नोकरीला लावले होते. २००९ मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यावर तो मुख्य वैद्यकीय अधिकारी बनला. २०१३ पर्यंत तो या पदावर काम करत होता.त्यानंतर त्याने विरारमध्ये ‘हायवे’ आणि नालासोपारामध्ये ‘नोबेल’ नावाची खासगी रुग्णालये सुरू केली होती. ही दोन्ही रुग्णालये अनधिकृत होती. या काळात त्याच्यावर बलात्काराचे दोन, एक चोरीचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. एका पीडितेच्या तक्रारीवरून त्याला डिसेंबरमध्ये अटक झाली होती. मात्र विरार पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तो जामिनावर सुटून फरार झाला होता.

नालासोपारामध्ये नोबेल हे अनधिकृत रुग्णालय चालवत असल्याने वाडकरवर गुन्हा दाखल होता. त्याला नुकतीच तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. वाडकर हा केवळ १२ वी पास असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वाडकरच्या रुग्णालयातील डॉक्टरही बोगस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील वाडकर याच्या हायवे आणि नोबेल या रुग्णालयात पांडे आणि सिंग नावाचे डॉक्टर कार्यरत होते.  हे दोन्ही डॉक्टर बोगस असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा आम्ही शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.  वाडकर हा निर्ढावलेला आरोपी आहे. त्याला  कृत्याचा पश्चात्ताप   नाहीच, उलट तो अतिशय उर्मट असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाडकर याने उपचार केलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्याची साक्ष नोंदवली जाणार आहे.  त्याची पत्नी आरती वाडकर हिच्यावरदेखील गुन्हे दाखल असून तिने अटकपूर्व जामीन मिळवला आहे.