करोना केंद्रात काम, महिलांशी अश्लील वर्तनाचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : तोतया डॉक्टर हेमंत पाटील ऊर्फ सोनावणे याने करोना काळात मीरा-भाईंदर महापालिकेची फसवणूक करून तब्बल एक वर्ष पालिका रुग्णालयाच्या करोना केंद्रात काम केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या काळात महिलांशी अश्लील वर्तन आणि गैरप्रकार केल्याच्या तक्रारीवरून त्याला निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी त्याची नियुक्ती करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनसेने शुक्रवारी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. तोतया डॉक्टर हेमंत पाटील ऊर्फ सोनावणे हा अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून २०१८ पासून वसईत धंदा करत होता. २०२० मध्ये करोना काळात त्याने मीरा-भाईंदर महापालिकेतही डॉक्टर असल्याची बतावणी करून काम केल्याचे उघड झाले आहे. ‘लोकसत्ता’ने त्याचा भांडाफोड केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

या एक वर्षांच्या काळात त्याने महिला कर्मचाऱ्यांशी केलेले अश्लील वर्तन, गैरप्रकाराच्या वाढत्या तक्रारी असल्याने त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. या काळात तो मासिक ६० हजार रुपये पगार घेत होता. पालिकेच्या डॉ. भीमसेन जोशी (टेंभा) रुग्णालयाच्या करोना केंद्रात तो कार्यरत होता. पालिकेच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्या अनिता दीक्षित यांनीदेखील त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हेमंत पाटील केवळ महिला रुग्णांच्या कक्षात काम करायचा. या काळात अनेक परिचारिका आणि इतर महिला कर्मचाऱ्यांशी तो लगट करत होता. माझी ओळख झाल्यानंतर त्याने मला अश्लील संदेश पाठवले होते. याबाबत मी भाईंदर पोलीस ठाण्यात तसेच पोलीस आयुक्तांना भेटून तक्रारी दिल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नव्हती. तत्कालीन आयुक्त राठोड यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्याला सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हेमंत पाटील (सोनावणे) याची पालिकेच कुठलीही तपासणी न करता नियुक्ती करणारे तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा मनसे जोरदार आंदोनल करेल असा इशारा मनसेने दिला. मनसे नेते संदीप राणे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी भीमसेन जोशी रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी निदर्शने केली. हेमंत पाटील हा तोतया असल्याची माहिती लोकसत्ताच्या माध्यमातून समजली. त्याची नियुक्ती आणि त्याने केलेल्या गैरप्रकारांची नव्याने चौकशी करण्यात येईल अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (आरोग्य) संजय शिंदे यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud doctor mira bhayander municipality ysh
First published on: 15-01-2022 at 00:38 IST