वसई : वसई विरार शहरात पावसामुळे ठप्प झालेल्या बाजारात पुन्हा एकदा रेलचेल दिसू लागली आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना. पूजेचे साहित्य, सजावटीचे सामान, मखर, गणपती बाप्पाची वस्त्र, तसेच नवे कपडे, मोदक आणि इतर नैवैद्याच्या तयारीसाठी लागणारी भांडी अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी खरेदीदारांनी सुट्टीच्या दिवशी बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याचे दिसून येत आहे.
वसई विरार शहरात गेल्या काही दिवसात कोसळलेल्या पावसामुळे विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. शहरातील दुकानं तसेच गृहसंकुलांमध्ये हे पाणी शिरले होते. सामानाची नासधूस होऊ नये म्हणून दुकानदारांकडून काहीकाळ दुकानं बंद ठेवण्यात आली होती. तर वाहतुक ठप्प झाल्यामुळे, ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकही घराबाहेर पडणे टाळत होते. पण, जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर शहरातील बाजारपेठाही पुन्हा सुरु झाल्या आहेत. तसेच गणेशोत्सवाआधी शनिवार आणि रविवार हे दोन सुट्टीचे दिवस मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. यामुळे बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पुन्हा एकदा दिसून येत आहे.
वसई आणि विरार पश्चिम स्थानकालगत भरणारा बाजार. तसेच पारनाका, होळी अशा विविध ठिकाणी भरणाऱ्या बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी फुलं, धूप, कापूर, अबीर बुक्का, गुलाल, फुलवाती, कंठी असे विविध पूजेचे सामान, कृत्रिम फुले, तसेच मणी, गोंडे, हिरे यांपासून तयार केलेल्या माळा, मखर, वेगवगेळ्या प्रकारची विद्युत रोषणाई असे सजावटीचे सामान घेण्यासाठी खरेदीदारांनी बाजारात गर्दी केली आहे.
गणेशोत्सवानिमित्त नवीन कपड्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महिलांसाठी भरजरी साड्या, तर पुरुषांसाठी कुर्ते आणि धोतर यांसारख्या पारंपरिक पोशाखांची मागणी वाढली आहे. लहान मुलांसाठी खास तयार केलेल्या साड्या आणि धोतरही मोठ्या प्रमाणात विकत घेतले जात आहेत. याशिवाय, चांदी, सोने, ऑक्सिडाइज आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीसाठीही महिला वर्गात उत्साह दिसून येत आहे.
नैवेद्यासाठी खास भांड्यांची खरेदी
दरवर्षी गणेशोत्सवात बाप्पाला, मोदकांसह वेगवेगळ्या प्रकारचा नैवद्य दाखवला जातो. तसेच गेल्या काही काळात आणि खासकरून समाजमाध्यमांवर टाकण्यात येणाऱ्या छायाचित्रांमुळे हा नैवद्य अतिशय सुंदर सजवता यावा असा महिलावर्गाचा प्रयत्न असतो. त्यामुळे यंदा कमी वेळात जास्तीत जास्त सुबक मोदक बनवता यावेत म्हणून मोदकाचा साचा, नक्षीकाम केलेल्या स्टीलच्या ताट आणि वाट्या, तसेच फुलांची चित्र असणारी भांडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांची खरेदी महिलांकडून करण्यात येत आहे.
वाहतूक कोंडीमुळे गैरसोय
एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खरेदीदार बाहेर पडल्यामुळे बाजारपेठांजवळच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी दिसून आली. रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांमुळे आणि रिक्षा व बससाठी थांबलेल्या नागरिकांमुळे वाहतुकीची गती मंदावली होती, ज्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला.