वसई: वसई विरार शहरातील नैसर्गिक तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेच्या या उपक्रमाला गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान एकूण ७९ टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून वसई विरार महापालिकेकडून शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जावा यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.  यावर्षीही पालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात आले होते. विशेषतः नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने  शहरात विविध ठिकाणी ११६ कृत्रिम तलाव उभारले होते. सहा जेट्टींच्या ठिकाणी व दोन बंद दगडखाणींच्या ठिकाणीही विसर्जनाची सोय करण्यात आली होती. तसेच ९ प्रभागांमध्ये १८ फिरते हौद उपलब्ध करून देण्यात आले होते. यावेळी कृत्रिम तलावाची माहिती सहज मिळावी म्हणून पालिकेकडून व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवाही पुरवण्यात आली होती.   

वसई विरार शहरात गणेशोत्सव काळात गणपती विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. दहा दिवसात शहरातील विविध विसर्जन स्थळी  ३२ हजार ८७७ इतक्या गणेश मूर्तीचे विसर्जन पालिकेच्या कृत्रिम तलावात करण्यात आले. यात २४ हजार ८८१ घरगुती व १ हजार ५९ सार्वजनिक अशा एकूण २५ हजार ९४० मूर्तींचा समावेश होता. यामुळे यावर्षी ७९ टक्के गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. तर ६ हजार ९३७ इतक्या मूर्तींचे विसर्जन तलाव, खाडी आणि समुद्र अशा नैसर्गिक जलस्रोतात करण्यात आले. 

नागरिकांसाठी विशेष सुविधा

विसर्जनस्थळी नागरिकांच्या सोयीसाठी मंडप व्यवस्था, आरती स्थळे, दिवाबत्ती सोय, मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य कलश, वैद्यकीय मदत कक्ष आदी आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. तर विसर्जनस्थळी महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवकही नागरिकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले होते.

कन्वेअर बेल्टमुळे विसर्जन प्रक्रिया सुलभ

यावर्षी २ बंद असलेल्या दगड खाणींच्या ठिकाणी कन्वेअर बेल्टची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली होती. कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या मूर्ती संकलित करून दगड खाणींमध्ये असलेल्या तलावात विसर्जित करण्यात आल्या. कन्वेअर बेल्ट असल्याने विसर्जन प्रक्रिया अधिक सुलभ रित्या पार पडली.