वसई: वसई पूर्वेच्या नवघर औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून औद्योगिक गाळ्याचे व साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वसई पूर्वेच्या नवघर येथील औद्योगिक वसाहतीत मनीष इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्री नंबर १ मधील पहिल्या मजल्यावरील गाळा नंबर ११४ मध्ये एका सिलेंडर बाटल्याचा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की गाळ्याचे ग्रील ,सज्जे उडून समोरील इस्टेट मनीष २ वर जाऊन धडकले.
शेजारील ११३ नंबर तसेच इतर गाळ्यांचे ही अतोनात नुकसान झाले आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. त्यांनी घटना स्थळी दाखल होऊन गाळ्यात अडकून पडलेल्या पाच जणांची सुखरूप सुटका केली. या स्फोटात एक जण किरकोळ जखमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनास्थळी पोहचून शिवसेना शाखा प्रमुख गणेश पाटकर यांनी व आजुबाजूच्या गाळा धारकांनी सहकार्य केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.सदर इमारतीत जाणे सद्या धोक्याचे आहे.कारण सज्जे,स्लॅब,इतकेच काय तर भिंती देखील हलल्या आहेत ज्या कोसळण्याची पूर्ण शक्यता असल्याचे माजी नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी सांगितले आहे.