Pipeline leak : वसई: नालासोपारा पूर्वेच्या वसंत नगरी परिसरात पाईपलाईनला गळती लागल्याची घटना शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. गळतीमुळे जमिनीला बसणारे हादरे पाहून आसपास उभ्या असणाऱ्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. तर काहींनी घडल्या प्रकाराची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला आणि पोलिसांना कळवली. पण, या घटनेबाबत अग्निशमन दलाने केलेल्या खुलाशातून मात्र या गळतीमागे एक वेगळेच कारण असल्याचे समोर आले आहे.
नालासोपारा पूर्वेच्या भागात वसंत नगरी परिसर आहे. शनिवारी सकाळी या भागातील रस्त्यावर अचानक जमीन वर उचलली जाऊन, जमिनीला हादरे बसण्याचा प्रकार घडला. या भागात गुजरात गॅस कंपनीकडून घरगुती गॅसच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे गॅस वाहिनीला लागलेल्या गळतीमुळे हे हादरे बसत असल्याचा अंदाज घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी बांधला. यात भर म्हणून वाहिन्यांमधून गॅसचा वास येत असल्याचा दावाही काहींनी केला.
यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घडला प्रकार पाहता घाबरलेल्या वाहनचालकांनी गळतीच्या ठिकाणाहून पळ काढायला सुरुवात केली. तर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनीही आपल्या गाड्या वळवल्या. तसेच घटनास्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून नागरिकांनी या बाबतची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला आणि पोलिसांना कळवली.
पण, या घटनेबद्दल अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीमुळे मात्र या घटनेला वेगळंच वळण आलं आहे. ही गळती गॅस वाहिनीमुळे नव्हे तर जलवाहिनीमुळे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शहरात नव्या जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरु आहे. त्यातल्याच एका जलवाहिनीची चाचणी सुरु होती. पण त्या जलवाहिनीतून अचानक गळती सुरु झाल्यामुळे जमीन थोडीशी उचलली गेल्याचे त्यांनी सांगितले आणि ही गॅस गळती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
यापूर्वी घडल्या होत्या गॅस गळतीच्या त्यामुळे चिंता.
३० एप्रिल २०२४ रोजी नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रस्त्यावर गॅस गळतीची घटना घडली होती. नालासोपाऱ्यातील द्वारका हॉटेल शेजारी वसई विरार महापालिकेकडून गटार बांधणीचे काम सुरू होते. ज्याठिकाणी गटार बांधणीचे काम सुरु होते, त्याच भागातून गुजरात गॅसच्या कंपनीच्या वाहिन्या गेल्या आहेत. गटाराचे काम सुरु असताना वापरण्यता आलेल्या जेसीबीमुळे एक गॅसवाहिनी दबली गेली आणि त्या वाहिनीचा स्फोट झाला.
तर २०२२ मध्येसुद्धा नालासोपारा पूर्वेच्या नक्षत्र वेलफर सोसायटी येथील इमारतीमध्ये घरगुती गॅसची गळती झाल्याची घटना घडली होती. या गॅस गळतीमुळे परिसरात आगही लागली होती. अशा घटना यापूर्वी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.