चार ठिकाणी दाहिन्या बसविण्यासाठी प्रस्ताव; प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेची उपाययोजना

वसई : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील चार ठिकाणच्या स्मशानभूमीत गॅस दाहिन्या बसविण्यात येणार आहेत. यासाठी प्रस्ताव तयार केला असून लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे. वसई-विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शंभरहून अधिक स्मशानभूमी आहेत. मात्र गॅस दाहिनी असलेली आचोळे येथे एकच स्मशानभूमी आहे.  तर दुसरीकडे इतर ठिकाणच्या काही स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधीच्या वेळी निघणारा धूर बाहेर सोडण्यासाठी चिमण्याही बसविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हा धूर आजूबाजूच्या भागात व नागरी वस्तीच्या भागात पसरून प्रदूषण निर्माण होत असते.  याबाबत अनेकदा पालिकेकडे तक्रारीही येत असतात. शहरातील प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी त्यावर विविध अंगाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी राष्ट्रीय हवा शुद्धीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून निधीही प्राप्त झाला आहे. याच अनुषंगाने पालिकेने पालिकेच्या क्षेत्रातील नवघर, पाचूबंदर, विरार पूर्व, सोपारा समेळपाडा या चार ठिकाणच्या स्मशानभूमीत गॅस दाहिन्या लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गॅस दाहिन्या असलेल्या स्मशानभूमींची संख्या ही पाच इतकी होणार आहे. यासाठी साडेतीन कोटी रुपये इतका निधी  खर्च केला जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. या गॅस दाहिन्यांमुळे अंत्यसंस्कार करताना निघणारा धूर हा बाहेर पडणार नाही व जे धुरामुळे प्रदूषण निर्माण होते त्याला आळा बसेल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

करोना काळात आचोळेतील गॅस दाहिनी असलेल्या स्मशानभूमीचा अधिक वापर

वसई विरार शहरात सद्य:स्थितीत आचोळे येथील स्मशानभूमीत एकमेव गॅस दाहिनीची सुविधा असलेली स्मशानभूमी आहे. याआधी ती दाहिनी काही वर्षे बंद स्थितीत होती. मात्र करोनाचा काळ सुरू झाल्यापासून या गॅस दाहिनी असलेल्या स्मशानभूमीचा वापर अधिक प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून आले होते. करोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांवर याच गॅस दाहिनी असलेल्या स्मशानभूमीत ठेवून अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यामुळे करोनाकाळात या गॅस दाहिनीचा वापर अधिक झाल्याचे दिसून आले.