भाईंदर:- ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या अंतिम टप्प्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कामास मुदत वाढ देण्यास राज्य पुरातत्व विभागाने नकार दिला आहे. नियम डावलून प्रशासनाने किल्ल्यावर बेकायदेशीर ध्वज उभारल्याने या अडचणी उभ्या राहिल्या आहेत
मिरा भाईंदरचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या घोडबंदर किल्ल्याचे जतन व्हावे यासाठी त्याचे सुशोभीकरण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या परातत्व विभागाने पाच वर्षांसाठी महापालिकेला हा किल्ला दत्तक देऊन सुशोभीकरणाच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले. मात्र पाच वर्षांची मूदत गेल्यावर्षी जून महिन्यात संपुष्टात आली आहे. त्यानंतर महापालिकेने मूदतवाढीसाठी पुरातत्व विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र किल्ल्याच्या बुरुजाला संरक्षक कठडा, हिरवळ व्यवस्थापन, बाहेरील भागात पर्यटकांसाठी वाहनतळ, स्वच्छतागृह, प्रवेशद्वार आदी कामे शिल्लक राहिली आहेत. त्यासाठी पुरातत्व विभागाची ना हरकत आवश्यक आहे.
मात्र पुरातत्व विभागाकडून अलिकडेच महापालिकेचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. किल्ल्यातील बुरुजावर दोन वर्षांपूर्वी महापालिकेने स्वराज्य भगवा ध्वज उभारला आहे.या ध्वज उभारणीला पुरातत्व विभागाकडून हरकत घेण्यात आली आहे. या ध्वज उभारणीसाठी पुरातत्व विभागाची परावनगी घेण्यात आली नसून हा ध्वज सन्मानपूर्वक किल्ल्यासमोरील उद्यानत उचित ठिकाणी स्थलांतर करण्यात यावा, पुरात्तव विभागाच्या नियमावलीनुसार नसलेले नविन बांधकाम व स्मारकाच्या शोभेस नसणारे परिसरात लावण्यात आलेले फलक काढण्यात यावे असे पत्र पुरातत्व विभागाकडून महापालिकेला देण्यात आले आहे. ही कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच पुरातत्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाईल,असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेचे स्पष्टीकरण
घोडबंदर किल्ल्याच्या मूळ बांधकामाला कोणताही धोका न देता एका बाजूला हा ध्वज उभारण्यात आला आहे. तसेच किल्ल्यावर बसवण्यात आलेले फलक देखील तात्पुरते असून ते हटवले जाणार आहेत.त्यामुळे यापुढे नियमांचे पालन करूनच किल्ल्याच्या उर्वरित सुशोभीकरणाचे काम केले जाईल, असे पत्र महापालिकेने पुरातत्व विभागाला पाठवले आहे.
शिवसृष्टीचे ही काम रखडले
घोडबंदर किल्ल्याच्या जवळ असलेल्या शासकीय ९ एकर जागेत किल्ल्याच्या तटबंदीपासून ३५ मीटर अंतर सोडून हा शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहिती देणारी वास्तू उभारली जाणार आहे.हा प्रकल्प उभारण्यासाठी ५४ कोटी रुपये खर्चाचा अहवाल राज्य शासनाला पालिका प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे.यास तीन वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली आहे.त्यावरून संपूर्ण प्रकल्प खर्च शासनामार्फत उचलला जाणार आहे. याबाबतचे शासन आदेश ५ सप्टेंबर २०२४ प्रसिद्ध करण्यात आले आहेत.मात्र अजूनही हे काम सुरु झाले नसल्याचे समोर आले आहे.