वसई : वसईत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने बाजी मारली आहे. ग्रामपंचायतीच्या १५ पैकी ९ जागांवर बविआचे सरपंच निवडून आले आहेत. तर दोन ठिकाणी भाजप, तीन अपक्ष तर एका जागेवर श्रमजीवी संघटनेचा सरपंच निवडून आला आहे. वसईतील  १५ ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदासाठी ४६ उमेदवार रिंगणात उतरले होते. यातील नऊ ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे सरपंच निवडून आले आहेत. यात पाणजू, पारोळ, करंजोन, मालजीपाडा,  टीवरी, खार्डी डोलीव, वासलई, नागले, तरखड- आक्टण या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

कळंब आणि टेम्भी कोल्हापूर या दोन ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळविला आहे. तिल्हेर, खोचिवडे, रानगाव या तीन ग्रामपंचायतींवर गाव परिवर्तन व गाव संघर्ष समितीचे सरपंच निवडून आले आहेत. तर टोकरे खैरपाडा या ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेने बाजी मारली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उज्वला भगत, नायब तहसीलदार चंद्रकांत पवार, प्रत्येक विभागनिहाय नेमलेले निवडणूक विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मतमोजणी शांततेत पार पडली.

पाणजूत ४० वर्षांनंतर सत्ता परिवर्तन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाणजू बेट ग्रामपंचायतीवर मागील ३५ ते ४० वर्षांपासून भाजपची एकाहाती सत्ता होती. मात्र यंदाच्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या सत्तेला सुरुंग लागला असून बहुजन विकास आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. सात जागांपैकी सरपंचासह पाच जागेवर बविआचे उमेदवार निवडून आले आहेत, तर केवळ दोन ठिकाणी भाजपचे सदस्य निवडून आले आहे.