वसई : पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरात शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. वसई पूर्वेतील तानसा नदीवर असलेला पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे. यंदाच्या वर्षात हा चौथ्यांदा पूल पाण्याखाली गेला असून आजूबाजूचे गाव व पाड्या वस्त्यांचा येथून ये जा करण्याचा मार्ग बंद झाला आहे.

वसई पूर्वेतील परिसरात भाताने, नवसई , आडणे, थल्याचापाडा  व इतर २० ते २५ पाडे व वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ये जा करण्यासाठी तानसा नदीवर पूल तयार करण्यात आला आहे. पुलाची उंची जास्त नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो. शुक्रवारी सकाळपासून पालघरसह वसई विरार भागात ही हजेरी लावली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील नद्या , नाले व ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले असून ओसंडून वाहणाऱ्या तानसा नदीने दुथडी भरून वाहायला सुरवात केली . तर काही ठिकाणी नदीने आपला किनारा सोडला असून सखल भागात पाणीच पाणी झाले. या वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे हे पाणी थेट पांढरतारा पुलाच्या वरून जाण्यास सुरवात झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदाच्या पावसाळ्यात हा पूल चौथ्यांदा पाण्याखाली गेला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. यामुळे यापुलावरून वाहतूक व प्रवास पूर्ण पणे ठप्प झाला आहे. या आजूबाजूच्या गावासह जवळचा रस्ता म्हणून वज्रेश्वरीच्या दिशेने जाणारे नागरिक ही याच मार्गाचा वापर करतात. आता पुलावरच पाणी आल्याने येथील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना महामार्गावरील भालिवली बाजूने साधारण १३ किलोमीटर वळसा घेऊन किंवा नव्या मेढे पुलावरून भिनार मार्गे प्रवास करावा लागत आहे.