भाईंदर : मंगळवारी सकाळपासून मिरा-भाईंदर परिसरात जोरदार पाऊस कोसळत असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या अंत्यविधीची प्रक्रिया एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

मिरा-भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचे सोमवारी मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात निधन झाले. युरीन इन्फेक्शनच्या आजाराशी लढा देत असताना उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्यविधीची प्रक्रिया मंगळवारी सायंकाळी चार वाजता भाईंदर येथील अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चमध्ये पार पडणार होती. मात्र सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे सखल भाग पाण्याखाली गेल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

मेंडोन्सा हे लोकप्रिय नेते असल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीच्या दृष्टीने अंत्यविधीची प्रक्रिया बुधवारी सायंकाळी चार वाजता पार पाडण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली आहे. सध्या त्यांचे पार्थिव भाईंदर (पश्चिम) येथील राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी शोकसभा आयोजित केली जाणार आहे.