वसई : वसई विरार शहरात मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुराच्या पाण्यात वसई भोयदापाडा राजावळी येथील बैठ्या चाळीत अडकून पडलेल्या ३० नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
मागील चार दिवसांपासून शहरात पावसाने थैमान घातले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने संपुर्ण शहर जलमय होऊन गेले आहे. याचा फटका वसई पूर्वेच्या भागात असलेल्या बैठ्या चाळींना सुद्धा बसला आहे.अनेक ठिकाणच्या बैठ्या चाळीत पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
वसई पूर्वेच्या भोयदापाडा – राजावळीं परिसरात ही मोठ्या प्रमाणात चाळी आहेत. याच चाळीत पावसाचे पाणी शिरले होते. यात जवळपास तीस हुन अधिक नागरिक अडकून पडले होते. याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून तातडीने त्यांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू केले आहे.आतापर्यंत या चाळीतून ३० नागरिकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे.