वसई : वसईत सध्या मुसळधार पाऊस सुरु असून शहरत सर्वत्र पाणी साचले आहे. त्यात रस्त्यांना नद्याचे रूप आले आहे. सोमवारी अशाच खड्डेमय आणि जलमय रस्त्यातून दुचाकीवरून जाताना खड्ड्यात दुचाकी अडकून महिला खाली पडून अपघात घडला आहे. या अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पाठी मागून येणाऱ्या बस चालकाने प्रसंगवधान राखत बस थांबविल्याने मोठा अनर्थ टळला

वसईच्या पश्चिम भागात गिरीज गावातील हे अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आहे. गणनाका ते गिरीज रस्ता गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाहनचालकांना इथून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते आहे. सोमवारी दुचाकीवरून जाणारे दोघे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात थोडक्यात बचावले. सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्यात वेग कमी असलेली एक दुचाकी रस्त्यात पाणी साचल्यामुळे खड्डा लक्षात न आल्याने आपटते. दुचाकीच्या मागे असणारी महिला थेट वेगात खाली पडते. सुदैवाने ही महिला बसलेल्या अवस्थेतचं पडल्याने गंभीर दुखापत झाली नाही.

पण मागून येणाऱ्या बसचा वेग जर वेळीच नियंत्रणात आला नसता तर मात्र मोठा प्रसंग उद्भवला असता. मात्र बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबल्याने आणि महिलेचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला.रस्त्यावर विविध ठिकाणी पडलेले खड्डे साचलेल्या पावसात अति धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.