भाईंदर : मुसळधार पावसाच्या हजेरीमुळे मिरा-भाईंदर शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.त्यामुळे वाहतूक मंदावली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.मागील चार दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून सतत पाऊस कोसळत आहे. सोमवारी एका दिवसात जवळपास २७७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर मंगळवारी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करून अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला असून, शहरातील बहुतांश भागात पाणी साचले आहे. त्यात सकाळी साडेनऊच्या सुमारास भरतीची वेळ असल्यामुळे या पाण्याचा विसर्ग होण्यास अडचण निर्माण झाली.

परिणामी शहरात पाणी साचण्याची समस्या गंभीर झाली आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या ८८ सखल भागांबरोबरच इतरही अनेक ठिकाणी पाणी भरल्याचे दिसून आले. यामध्ये बेकरी गल्ली, क्वीन्स पार्क, काशी नगर, कृष्ण स्थळ आणि ग्रीन व्हिलेज या भागांत जवळपास तीन ते चार फूट पाणी साचले होते. त्यामुळे दुकानांमध्ये आणि तळ मजल्यांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

मुख्य मार्ग पाण्याखाली :

सतत कोसळत असलेल्या पावसामुळे मिरा-भाईंदर शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय यंदा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आणि घोडबंदर मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे पालिकेची परिवहन सेवा तसेच रिक्षा उपलब्ध न झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

परिस्थिती नियंत्रणात असल्याचा प्रशासनाचा दावा :

मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले असले तरी, आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि उपायुक्त सचिन बांगर हे स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ज्या ठिकाणी जास्त पाणी साचले आहे, तिथे पाणी उपसण्यासाठी पंप लावण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे पाणी साचलेले असले तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.