वसई: वसई-विरार शहरात ‘हिट अँड रन’ मुळे अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. शुक्रवारी दुपारी बाजारात गेलेल्या एका वृद्ध महिलेला भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून, तिचा खांदा फ्रॅक्चर झाला आहे.
वसई पश्चिमेकडे अंबाडी मार्ग परिसर आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० ते १.०० वाजण्याच्या सुमारास या भागात एक दुचाकीस्वाराने एका महिलेस जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव हरदेवी जयराज (६७) असे असून त्या शास्त्रीनगर परिसरातील रहिवासी आहेत. शुक्रवारी दुपारी त्या अंबाडी मार्गावरून भाजी घेऊन घरी परतत होत्या. त्याचवेळी हा अपघात घडला. दुचाकीस्वाराने दिलेली धडक इतकी भीषण होती की, महिला रस्त्यावर कोसळली आणि तिच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. पण, धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार मात्र न थांबता घटनास्थळावरून पळून गेला.
अपघातानंतर तेथील नागरिकांनी तातडीने हरदेवी जयराज यांना उचलून जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा डावा खांदा निखळला असून तो फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले आहे. तसेच जखमी महिलेवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. जखमी महिलेच्या मुलीने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत “बाईकस्वाराने दिलेल्या धडकेत माझ्या आईला गंभीर दुखापत झाली असून तिचा खांदा निखळला आहे. डॉक्टरांनी आम्हाला त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही यासंबंधी माणिकपूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून माझ्या आईच्या अपघाताला जबाबदार असणाऱ्या दुचाकीस्वाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकीस्वाराचा कसून शोध घेत आहेत. तर वसई-विरारमध्ये अशा ‘हिट अँड रनच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेफिकीर दुचाकीस्वरांचा उन्माद
वसई विरार शहरात अलीकडच्या काळात भरदाव वेगात वाहन चालवून हुल्लडबाजी करणारे दुचाकी चालक दिसून येतात. वाहतुकीचे नियम न पाळता रस्त्यावरून वेगात गाडी चालवणे, स्टंटबाजी करणे, रस्त्यावर आरडाओरड करणे, रात्री अपरात्री रहदारीच्या रस्त्यांवर दुचाकीची शर्यत लावणे, आरडाओरड करणे असे प्रकार सर्रास शहरात घडताना दिसत आहेत. तर अनेकदा तक्रार करूनही यावर ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
