वसई:- वसई विरारच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या रस्ते, उड्डाणपूल अशी कोट्यवधींची कामे आम्ही मंजूर करवून घेतली आहेत.मात्र एक वर्षाचा कालावधी उलटून गेलं तरीही आताच्या सत्ताधाऱ्यांकडून कामाच्या निविदा काढण्याची कुवत नसल्याचा घणाघात माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. वसई चिंचोटी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. त्यांच्या खळबळजनक वक्तव्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच बविआ आणि भाजप असा संघर्ष आणखीनच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूकीच्या दृष्टीने बहुजन विकास आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात विभाग निहाय मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. रविवारी वसई नायगाव पूर्वेच्या भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी चिंचोटी येथे मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर ही उपस्थित होते. यावेळी आगामी येणाऱ्या निवडणुकीची रणनीतीच्या संदर्भात माहिती देत असतानाच सत्तेत असताना केलेल्या विविध कामांचा ही लेखाजोखा या सभेत त्यांनी मांडला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एमएमआरडीएचे अधिकारी यांच्या सोबत आमच्या शिष्टमंडळाने बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे महावितरणच्या उपकेंद्रांची कामे सुरू झाली असल्याचे त्यांनी या सभेत सांगितले आहे.

काय म्हणाले हितेंद्र ठाकूर ?

यावेळी बोलताना ४ रेल्वे उड्डाणपूल असतील, अंतर्गत उड्डाणपूल, ७ मुख्य रस्ते असतील अशी सगळी जवळपास ७ हजार २०० कोटींची कामे आमच्या कार्यकाळात आम्ही मंजूर करवून घेतली आहेत. याला जवळपास एका वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. असे असताना साधी निविदा काढण्याची पण कुवत सत्ताधाऱ्यांमध्ये नाही असा टोला हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाला या सभेदरम्यान लगावला आहे. आता जे काही सुरू आहे ते केवळ पत्र देऊन सुरू आहे ते ही कागदोपत्रीच आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आवाहन

वसई विरार शहरात तब्बल ५ वर्षांनी महापालिका निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणूक ही भाजपसाठी पक्षविस्ताराची मोठी संधी ठरणार आहे. तर बहुजन विकास आघाडी पक्षासाठी हा अस्तित्वाचा प्रश्न ठरणार आहे. त्यामुळे नायगाव येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार हितेंद्र ठाकुर यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे.