कुणाला उमेदवारी मिळणार, कुणाचे तिकीट कापले जाणार, कोण डावलले जाणार, कोण मुसंडी मारणार… विधानसभा निवडणुकीच्या आधी मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या राजकारणाचा आणि त्यामागील कारणांचा ठाव घेणारे हे वृत्तसदर…

Assembly Election 2024 वसई : पालघर लोकसभा क्षेत्रातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या बहुजन विकास आघाडीचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव पक्षाच्या अस्तित्वालाच सुरुंग लावणारा आहे. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर ‘ही माझी शेवटची निवडणूक’ असे जाहीर करणारे बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे आता काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>> वसईतील रेल्वे मार्गिकेचे नव्याने सर्वेक्षण सुरू, एक महिन्याने नव्याने भूसंपादन अधिसूचना प्रसिद्ध होणार

पालघर जिल्ह्यापुरताच मर्यादित असलेल्या बविआची वसई, नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही मतदारसंघांमध्ये चांगली ताकद आहे. या मतदारसंघांत बविआचे आमदार निवडून येत आहेत. वसई विरार महापालिकेत पूर्वीपासून बविआची एकहाती सत्ता आहे. याशिवाय सहकार, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदींमध्ये या पक्षाचे वर्चस्व आहे. असे असताना लोकसभा निवडणुकीत बविआचा उमेदवार तिसऱ्या स्थानी फेकला गेला. महायुतीचे हेमंत सावरा विजयी झाले, तर महाविकास आघाडीच्या भारती कामडी यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली. सावरा यांना वसईतून जवळपास १० हजार, नालासोपाऱ्यातून ५७ हजार, तर बोईसरमधून ३९ हजार मताधिक्य मिळाले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही बविआसमोर तगडे आव्हान उभे ठाकले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले होते. मात्र पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर ठाकूर हे पुन्हा मैदानात उतरतात का, हे पाहावे लागणार आहे. बविआसमोर येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींचे आव्हान आहे. मागील निवडणुकीत एकत्रित शिवसेना-भाजप होती. बविआबरोबर असलेला काँग्रेस-राष्ट्रवादी आता महाविकास आघाडीमघ्ये आहे. महायुती आणि महाविकास आघाडी रिंगणात असणार आहेत.