वसई- ठेकेदार निष्काळजीपणे काम करत असून त्यामुळे दुर्घटना होऊ शकते अशी लेखी सुचना आचोळे पोलिसांनी १३ दिवसांपूर्वीच महापालिकेला केली होती. मात्र त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने द्वारका आगीची दुर्घटना घडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे संतप्त झालेले नागरिक गुरुवारी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जोरदार निर्दशने केली.

मंगळवारी दुपारी नालासोपारा पश्चिमेच्या आचोळे येथे गॅस पाईपलाईन फुटल्याने लागेलल्या आगीत द्वारका हॉटेल जळून खाक झाले होते. या आगीत हॉटेलमध्ये आलेले ८ ग्राहक आणि कर्मचारी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हॉटेलसमोर गटाराचे काम सुरू असताना गॅसपाईप लाईन फुटल्याने ही आग लागली होती. याबाबत पोलिसांनी महापालिकेला पत्र देऊन दुर्घटनेची शक्यता वर्तवल्याचे आता उघड झाले आहे. गटाराचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले जात होते. या कामामुळे अनेक दुकानांचेही नुकसान झाले होते. ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे, त्या ठिकाणी अतिशय जुन्या इमारती आहेत. त्यामुळे पोलिसांनी दुर्घटनेची शक्यता वर्तवली होती. ठेकेदाराच्या या निष्काळजीपणाबाबत आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ बाळासाहेब पवार यांनी १७ एप्रिल रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन चौकशीची मागणी केली होती. मात्र आयुक्तांनी पोलिसांच्या पत्राकडे दुर्लक्ष केले. पोलिसांनी वर्तवलेली शक्यता खरी ठरली आणि मंगळवारी आग लागली. गटाराचे काम सुरू असताना पोकलेनमुळे गुजरात गॅस कंपनीची पाइपलाइन फुटली. यामुळे स्फोट होऊन भीषण आग लागली. आगीने संपूर्ण हॉटेलला वेढले. हॉटेलममध्ये ठेवण्यात आलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले होते, असे पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांनी सांगितले.

हेही वाचा – कोण नरेश म्हस्के? मिरा भाईंदरच्या कार्यकर्त्यांचा सवाल, भाजप पाठोपाठ शिवसेनाही नाराज

दोन जखमींची प्रकृती चिंताजनक

या आगीत ८ जण होरपळे असून त्यातील दोन जण ७० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राम प्रसाद चौधरी, माखन लाल, इरसद शेख, चंद्र मोगावे, सुंदर शेट्टी, गोपाल बंगेरा, सुनील यादव, शिवा पासवान, राजकुमार आणि आकृती यादव अशी जखमींची नावे आहेत. सुंदर शेट्टी आणि गोपाल बंगेरा हे ७० टक्के भाजले आहेत. जखमींपैकी दोन जणांवर कस्तुरबा, चार जणांवर आयसीस या खासगी रुग्णालयात आणि तीन जणांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दोन जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

बुधवारी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आम्ही जखमी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहेत. यामध्ये कोणाची चूक आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले. बुधवारी पोलिसांनी १२ जणांचे जबाब नोंदवले. द्वारका हॉटेलच्या बाहेर गटार बांधण्याचे काम सुरू होते.

चिमुकली आणि गर्भवती महिला बचावली

गाला नगर येथील रहिवासी अंजू यादव (२८) ही गर्भवती असून तिचा सोनोग्राफीचा अहवाल घेण्यासाठी मंगळवारी दुपारी २ वाजता ती हॉटेलसमोरील डॉक्टरांकडे गेली होती. तिच्यासोबत पाच वर्षांची मुलगी आकृती यादव आणि शेजारी राहणाऱ्या दोन महिला होत्या. डॉक्टरांनी अंजूला थोड्या वेळाने यायला सांगितले होते. त्यामुळे अंजू आपली मुलगी आणि महिलांसोबत नाश्ता करण्यासाठी या द्वारका हॉटेलमध्ये गेली होती. ते खुर्चीवर बसताच अचानक समोरील काच फुटून आग लागली. कसेबसे अंजूने आपल्या मुलीसह बाहेर पडून तिचा जीव वाचवला. मात्र त्यांची मुलगी काही ठिकाणी भाजली.

हेही वाचा – विरारमध्ये ५ अनधिकृत इमारती, ३८ दुकाने आणि २५८ सदनिकांची विक्री

सलग ३ दिवसांपासू गॅस पुरवठा बंद, नागरिक संतप्त

गॅस लाइन फुटल्यानंतर गुजरात गॅस कंपनीने संपूर्ण परिसरातील गॅस पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे येथील सुमारे तीनशे कुटुंबांचा घरातील स्वयंपाकघर बंद आहे. लोकं बाहेरून जेवण मागवत आहेत. तीन दिवस झाले तरी गॅस पुरवठा पूर्ववत झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. यामुळे गुरुवारी सकाळी परिसरातील शेकडो संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. तासभर नागरिकांनी गोंधळ घातला. यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. गुजरात गॅस कंपनीच्या अधिकार्‍यांना नागरिकांच्या जनक्षोभामुळे काढता पाय घ्यावा लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आग दुर्घटनेची चित्रफित वायरल

या आगीची एक चित्रफित सध्या चर्चेत आहे. ठेकेदार चुकीच्या पद्धतीने खोदकाम करत असून दुर्घटना घडू शकते असे एक जण चित्रीकरण करून सांगत असतानाचा स्फोट झाला आणि आग लागली. नेमकी ती व्यक्ती दुर्घटना घडेल असे सांगते आणि आग लागली. हा योगायोग होता की काय याबाबत चर्चा सुरू आहे. ही चित्रफित कुणी बनवली ते मात्र समजू शकलेले नाही.