वसई : विरार येथील आगाशी स्मशानभूमीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात कचऱ्याचे ढीग तयार होऊन दुर्गंधी पसरली आहे. तर यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शंभरहून अधिक स्मशानभूमी बांधण्यात आल्या आहेत. पण महापालिकेकडून केले जाणारे दुर्लक्ष आणि देखभाल दुरुस्तीअभावी स्मशानभूमीची दुरावस्था झाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतात. असाच काहीसा प्रकार विरार पश्चिमेतील आगाशी स्मशानभूमी येथून समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आगाशी स्मशानभूमीच्या परिसरात टाकला जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

सातत्याने कचरा टाकल्यामुळे स्मशानभूमीच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. यात थर्माकोल आणि प्लास्टिकचा खच देखील मोठ्या प्रमाणावर आहे.या कचऱ्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. याचा फटका केवळ अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांनाच नाही, तर या भागात सकाळच्या वेळी चालण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनाही बसत आहे. त्यामुळे महापालिकेने या समस्येवर तत्काळ तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.पालिकेकडून त्या ठिकाणची पाहणी करून परिसर स्वच्छ करवून घेतला जाईल असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

अन्य ठिकाणी स्मशानभूमीची अवस्थ बिकट आगाशी स्मशानभूमीव्यतिरिक्त वसई विरारमधील इतर स्मशानभूमींची अवस्थाही बिकट झाली आहे. शहरातील बहुतांश ठिकाणच्या स्मशानभूमींचे बांधकाम जुने झाली आहे. त्यामुळे ढासळलेले प्लास्टर, तडा गेलेल्या भिंती, गांजलेल्या सळ्या गळके पत्रे, यामुळे स्मशानभूमीच्या इमारतींची दुरावस्था झाली आहे. तर काही ठिकाणी अंत्यविधीसाठी लाकडेच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. तसेच मूलभूत सुविधांच्या अभावी स्मशानभूमीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.