लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई- नालासोपारा मधील प्रसिद्ध डॉक्टर शशिबाला शुक्ला यांना बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालवत असल्याचे उघड झाले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने स्टींग ऑपरेशन करून या बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी डॉ शुक्ला यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा पूर्वेच्या विजयनगर मध्ये डॉ शशीबाला शुक्ला यांचे आशिर्वाद क्लिनिक नावाचा दवाखाना आहे. त्या डीएचएमएस असून गेली ३५ वर्ष हा दवाखाना चालवत आहेत. मात्र ते या दवाखान्यात बेकायेदशीररित्या गर्भपात केंद्र चालवत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार वैद्यकीय विभागाचे डॉ पंडीतराव राठोड, डॉ अनाया देव, डॉ कृपाली फर्डे, मनोज यादव यांनी स्टींग ऑपरेशन केले. डॉ शुक्ला यांच्याकडे एक डमी रुग्ण पाठवला. डॉ शुक्ला यांनी कुठलीही सोनोग्राफी न करता त्यांना गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यांना रंगेहाथ पथकाने पकडल्यानंतर तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. डॉ शुक्ला यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात कलम ४२० , बेकायदेशीर गर्भपात अधिनियम, औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसादन तसेच वैद्यकीय गर्भ समाप्ती अधिनियम २००३ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-Video: अंगावर गेल्या, शर्ट खेचला अन्…; आमदार गीता जैन यांची पालिका अभियंत्याला मारहाण

गर्भपाताच्या गोळ्या फक्त एमबीबीएस स्त्रीरोगतज्ञ देऊ शकतो. परंतु डॉ शुक्ला यांच्याकडे तशी कुठलीही शैक्षणिक पात्रता नाही आणि त्या बेकायेदशीरपणे रुग्णांना गर्भपाताच्या गोळ्या देत होत्या. त्या ॲलोपॅथीची प्रॅक्टीसही करत होत्या. अशाप्रकारे गोळ्या देणे रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं, अशी माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी दिली. गेली ३५ वर्ष त्या क्लिनिक चालवत आहे. त्यामुळे हा प्रकार गेली अनेक वर्ष सुरू असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. नागरिकांनी केवळ अधिकृत स्त्रीरोगतज्ञांकडूनच गर्भपातासंदर्भात उपचार घ्यावेत असे आवाहन डॉ चौधरी यांनी केले आहे..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री अडीच वाजता गुन्हा दाखल झाला आहे. आज कायदेशीर पडताळणी करून पुढील प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी दिली.