वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पूल ते विरार फाटा या दरम्यान विविध ठिकाणी बेकायदेशीर छेद रस्ते तयार झाले आहेत. या छेद रस्त्याच्या मधूनच काही वाहनचालक वाहने काढत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याशिवाय महामार्गावरील वाहतूक सेवा ही विस्कळीत होऊ लागली आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे.या महामार्गावर दिवसेंदिवस विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागल्याने याचा त्रास वाहनचालकांबरोबरच महामार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.
या महामार्गाच्या भागात प्राधिकरणाने ठीक ठिकाणी दुभाजक आहेत. मात्र काही ठिकाणी दुभाजक तोडून फोडून छेद रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्या छेद रस्त्याच्या मधूनच आजूबाजूच्या भागातील माती भराव, मिक्सर व इतर अवजड वाहने, मालवाहतूक वाहने, दुचाकी स्वार येथून थेट वळण घेत असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना समोर येत आहेत.
वर्सोवा पुलापासून ते ससूनवघर, मालजीपाडा, लोढा धाम, वास माऱ्या पूल, वसई फाटा, नालासोपारा यासह विरार फाट्या दरम्यान असे छेद रस्ते असल्याचे चित्र दिसून आहे.
दुभाजकाच्या मधून व उड्डाणपुला खालून वळसा घेण्यासाठी रस्ते उपलब्ध आहेत. मात्र तरी सुद्धा वाहनचालक अशा प्रकारे वाहने मध्येच आणून वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटी करण्याचे काम सुरू असून विविध ठिकाणी दुभाजक ही तयार केले जात आहेत. काही ठिकाणी मेटॅलिक स्वरूपाचे तर काही ठिकाणी काँक्रीटचे दुभाजक उभारण्यात येत असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.
वाहतूक सेवा विस्कळीत
महामार्गावर छेद रस्त्यातून वाहने काढली जात असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत होऊ लागली आहे.
नुकताच नालासोपारा पेल्हार येथेही छेद रस्त्यातून प्रवास सुरु असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या असे प्रवाशांनी सांगितले आहे.
सोयीसाठी बेकायदेशीर छेद रस्ते
मागील काही वर्षात राष्ट्रीय महामार्गालगत माती भराव कामे, उपहार गृहांची वाढती संख्या, आरएमसी कारखाने, व अन्य कारखाने उभे राहिले आहेत. त्यांच्या सोयीच्या दृष्टीने अशा प्रकारे छेद रस्ते तयार करवून घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यांच्या सोयीच्या दृष्टीने ते सोयीस्कर असले तर इतर प्रवासी प्रवास करतात त्यांच्या जीवावर असे छेद रस्ते बेतू शकतात यासाठी त्यावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.