वसई : वसई विरार शहरात मुदत उलटून ही बेकायदेशीर पणे खदाणी चालविल्या जात असल्याचा प्रकार समोर येत आहेत. नुकताच गौण खनिज भरारी पथकाने वसई पूर्वेच्या वालीव येथे बेकायदेशीर सुरू असलेल्या दगडखाणीच्या ठिकाणी कारवाई केली आहे. यात विना परवाना दगड वाहतूक करणारे दोन ट्रक आढळून आले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात दगड खाणी आहे. या दगडखाणी चालविण्यासाठी महसूल विभागाकडून परवानगी दिले जाते. याशिवाय त्या गौण खनिजाच्या माध्यमातून रॉयल्टी स्वरूपात महसूल विभागाला महसूल मिळतो. मात्र काही ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीर पणे दगडखाणी चालवित असल्याचे प्रकार समोर येत आहे. वालीव भागात ही दगडखाण आहे. त्याला महसूल विभागाने उत्खनन करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र मुदत उलटून गेल्यानंतर पुन्हा परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु त्यांनी परवानगी न घेताच या खाणीत उत्खनन करून त्यातून दगड वाहतूक सुरू होती. त्यावर पालघर जिल्ह्याच्या गौण खनिज विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे.

या कारवाई घटनास्थळी बेकायदेशीर पणे दगड खाण चालवून वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले आहे असे भरारी पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांनी सांगितले आहे. यात हायवा ट्रक मध्ये पाच ब्रासहून अधिक मुद्देमाल विना रॉयल्टी आढळून आला असून त्यांच्यावर ६ लाख ३४ हजार रुपये इतका दंड ही आकारण्यात आला आहे.याशिवाय क्रेशर मशीन सुद्धा सील करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले आहे. ही कारवाई भरारी पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार चंद्रकांत पवार, वसईचे निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते, अवल कारकून चौधरी व दोन पोलीस अधिकारी यांच्या पथकाने केली आहे.